Tuesday, November 3, 2026
Homeकृषीसम्राटनगर, पटेलनगरमधील घरांवर टांगती तलवार; पर्यायी मार्ग, ओव्हरब्रिजची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

सम्राटनगर, पटेलनगरमधील घरांवर टांगती तलवार; पर्यायी मार्ग, ओव्हरब्रिजची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

भुसावळ-बडनेरा रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक!
सम्राटनगर, पटेलनगरमधील घरांवर टांगती तलवार; पर्यायी मार्ग, ओव्हरब्रिजची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ-बडनेरा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावरून वरणगाव परिसरातील शेतकरी आणि प्लॉटधारक आक्रमक झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता, परवानगी व मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण न करताच रेल्वे प्रशासनाने शेतांमध्ये प्रवेश करून काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात २८ ऑक्टोबर रोजी भुसावळ प्रांत कार्यालयात भूसंपादन अधिकारी तथा एसडीएम जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. यावेळी रेल्वे अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाचे मोजणी अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी व प्लॉटधारकांच्या वतीने अॅड. धीरेंद्र प्रतापराव देशमुख आणि अॅड. यशवंत ए. महाजन यांनी विविध मुद्दे उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
रेल्वे मार्गामुळे प्रत्यक्ष जमीन संपादित न होणाऱ्या नागरिकांचीही कायमस्वरूपी वहिवाट आणि येण्या-जाण्याचे रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीची पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सम्राटनगर, सिद्धेश्वरनगर, पटेलनगर आणि रेल्वेच्या दक्षिणेकडील भागातील नागरिकांसाठी रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी करण्यात आली. ओव्हरब्रिज न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अॅड. देशमुख आणि नागरिकांनी दिला.
पाणीपुरवठा योजना बाधित होण्याची भीती
या भूसंपादनामुळे वरणगाव शहराच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन बाधित होण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संपादनापूर्वी पर्यायी पाइपलाइनची व्यवस्था करावी, अन्यथा संपादन होऊ देणार नाही, असा इशारा अॅड. यशवंत महाजन, अॅड. धीरेंद्र देशमुख आणि शेतकरी व प्लॉटधारकांनी दिला.
सुनावणीदरम्यान रेल्वे प्रकल्पाचा वर्किंग प्लॅन आणि डीपीआर उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. रेल्वे विकासाला विरोध नसून नागरिकांचे नुकसान, विस्थापन आणि मूलभूत सुविधांवर होणारा परिणाम याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका मांडण्यात आली. आता प्रशासन या आक्षेपांवर काय निर्णय घेते, याकडे वरणगाववासीयांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या