फोनवर बोलावले अन् गोळी झाडली! फुलगाव बायपासवर तरुणावर जीवघेणा हल्ला !

वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वरणगावनजीक फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास २८ वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून लोखंडी रॉडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात सरफराज सैय्यद बशीर सैय्यद (वय २८, रा. मुक्ताईनगर) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर दुचाकीवरून आलेले तिन्ही अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सरफराज हा भुसावळ येथे बी. एन. अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करतो. रविवारी काम आटोपून तो दुचाकीने मुक्ताईनगर येथील घरी जात होता. दरम्यान, त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर नेहमीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून न जाता तो पुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्याला अडविले.यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केले. त्यानंतर गावठी कट्ट्यातून त्याच्या पोटावर गोळी झाडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला नागरिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल व पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अनोळखी फोन करून निर्जन रस्त्यावर बोलावून हा हल्ला करण्यात आला का, हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि आरोपी कोण आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे वरणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

