Tuesday, November 3, 2026
Homeगुन्हासाक्ष देण्याच्या वादातून रक्तरंजित थरार! आधी धमकी, नंतर डंपरखाली चिरडून तरुणाची हत्या...

साक्ष देण्याच्या वादातून रक्तरंजित थरार! आधी धमकी, नंतर डंपरखाली चिरडून तरुणाची हत्या !

साक्ष देण्याच्या वादातून रक्तरंजित थरार! आधी धमकी, नंतर डंपरखाली चिरडून तरुणाची हत्या !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – विरोधात साक्ष देण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून चार जणांनी संगनमत करून एका तरुणाला वाळूच्या डंपरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील नांद्री गावाच्या बसस्थानकासमोर घडली. या घटनेत शरद रतन पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून डंपरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते अंगणात मोटारसायकल लावत असताना विपुल किरण गोसावी, सागर संजय गोसावी आणि मयूर अनिल बोरसे हे वाळूचे ट्रॅक्टर खाली करण्यासाठी आले होते. यावेळी ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने विचारणा करण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश्वर गोसावी व त्यांच्या पत्नीला संबंधितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यावेळी शरद रतन पाटील हे साक्षीदार होते. याच कारणावरून विपुल गोसावी याने शरद पाटील यांना विरोधात साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पाटील यांच्यासह काही जण सावखेडा येथील देव हॉटेलवर जेवणासाठी जात होते. नांद्री बसस्थानकाजवळ पातोंडा गावाकडून राखाडी रंगाची मारुती कार भरधाव वेगाने आली. या कारने महेश आत्माराम पाटील यांना कट मारून पुढे जाऊन थांबली. त्यातून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी खाली उतरले.त्याचवेळी पातोंडा बाजूकडून एच.आर. ३७ डी ८९५७ क्रमांकाचा डंपर आला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याने खाली उतरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवीण गोसावी यांनी विचारणा केली असता, विपुल गोसावी याने चालकाला संबंधितांना चिरडण्यास सांगितल्याचा आरोप आहे.त्यानंतर डंपरचालकाने वाहन भरधाव वेगाने त्यांच्या अंगावर आणले. यावेळी विपुल गोसावी व मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलले, तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. डंपरच्या चाकाखाली आल्याने शरद पाटील यांच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला. हल्ल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान,जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेने अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात येत होते. दरम्यान, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत केली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि डीवायएसपी विनायक कोते यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.आमदार अनिल पाटील यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी जिल्हाभर शोधमोहीम सुरू केली. दहिवद फाटा-पिंपळी मार्गे पळून गेलेला संबंधित डंपर बुधगाव येथे पकडण्यात आला. डंपरचालक भरत सुभाष पाटील याला पोलिसांनी रात्रीच अटक केली. या घटनेमुळे नांद्री परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या