Tuesday, November 3, 2026
Homeजळगावभुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
३९ विषयांना मंजुरी; नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक सभेला गैरहजर
भुसावळ      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            : भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा शैलेजा नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार, भाजपचे गटनेते युवराज लोणारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी सभेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सभेच्या सुरुवातीला नगरपालिकेचे अधिकारी वैभव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करून सभेपुढील ३९ विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या सभेत प्रभागनिहाय वैयक्तिक विषयांऐवजी शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित सार्वजनिक विषयांचा समावेश करण्यात आला होता.

यावेळी शहरातील सेंटर पोल, इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट, नालेसफाई, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच अमृत योजनेच्या कामांना गती देण्याबाबत चर्चा झाली. काही नगरसेवकांनी स्वच्छतेच्या प्रश्नावर तसेच पाणीपुरवठ्यातील अडचणींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. एक-दोन विषय वगळता बहुतांश विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, नगरसेवक राज चौधरी यांनी रहिवाशांच्या जागांवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. तर महिंद्रसिंग ठाकूर यांनी दीनदयाळ नगर व हनुमान नगर परिसरातील नागरिकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासंदर्भात निवेदन सादर केले.

 

सभेदरम्यान भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेले नगरसेवक सभेला उपस्थित नसल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, मूळ शिवसैनिक सभेला उपस्थित असल्याचे सांगत, अनुपस्थित नगरसेवक का आले नाहीत, याची आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आम्ही युतीधर्म पाळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकूणच, ३९ सार्वजनिक विषयांवर चर्चा करून बहुतांश विषयांना मंजुरी देण्यात आलेली ही सभा शांततेत पार पडली. मात्र, शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या नगरसेवकांची अनुपस्थिती हा सभेतील चर्चेचा आणि राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या