Wednesday, November 4, 2026
Homeगुन्हाजुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रचला कट; स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४५ मिनिटांत...

जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रचला कट; स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४५ मिनिटांत दोघांना ठोकल्या बेड्या

इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून ‘हनीट्रॅप’; वरणगावात बोलावून तरुणावर गोळीबार!

जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रचला कट; स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४५ मिनिटांत दोघांना ठोकल्या बेड्या

वरणगाव    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा बनाव रचत वरणगाव येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गावठी कट्ट्यातून दोन राऊंड गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४५ मिनिटांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास फिर्यादी सरफराज सय्यद साकीर सय्यद (वय २८, रा. काशीपुरा, मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांना इन्स्टाग्रामवरील एका तरुणीच्या नावाने असलेल्या ‘@ashwi_ni2083’ या अकाउंटवरून मेसेज व कॉल करण्यात आले. त्यांना वरणगाव येथील फुलगाव उद्यानाजवळील सर्कस रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते.

सरफराज हे घटनास्थळी पोहोचताच अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर प्राणघातक हल्ला केला. तसेच कमरेला लावलेल्या गावठी कट्ट्यातून दोन राऊंड गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

**जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कट**

पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. दि. १८ एप्रिल २०२५ रोजी बोदवड-मुक्ताईनगर महामार्गावर झालेल्या अपघाताच्या वादातून आरोपी सिद्धार्थ ढिवरे व भूषण सावळे यांचा फिर्यादी सरफराज व त्यांच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी आरोपींची गाडी फोडून त्यांना मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओही काढण्यात आला होता. झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे याने आपल्या मित्राच्या मोबाईलमधील ई-मेलचा वापर करून तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. दि. १७ ऑक्टोबरपासून या अकाउंटवरून सरफराज यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर दि. ३ नोव्हेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी बोलावून हल्ल्याचा कट अंमलात आणण्यात आला.

दोघे आरोपी फेकरी येथील

या प्रकरणात पोलिसांनी भूषण उर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०, शिक्षण बारावी, रा. फेकरी, ता. भुसावळ) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७, शिक्षण बी.ए., व्यवसाय ग्रामपंचायत सब-कंत्राटदार, रा. फेकरी, ता. भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा, मोटारसायकल व मोबाईल याबाबत पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक जळगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या