Tuesday, November 10, 2026
Homeजळगावप्रा. जगदीश खरात यांना ‘ज्ञानश्री २०२६’ पुरस्काराने सन्मानित

प्रा. जगदीश खरात यांना ‘ज्ञानश्री २०२६’ पुरस्काराने सन्मानित

प्रा. जगदीश खरात यांना ‘ज्ञानश्री २०२६’ पुरस्काराने सन्मानित

लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईत गौरव; पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

फैजपूर | खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

येथील धनाजी नाना महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. जगदीश घनश्याम खरात यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील तब्बल २२ वर्षांच्या उल्लेखनीय आणि भरीव योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘ज्ञानश्री अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (CIMR), बांद्रा, मुंबई यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला .

या सोहळ्यात अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रा. खरात यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चेतना शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार शिरीषदादा चौधरी, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. मधुमिता पाटील, चेतना इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संदीप नेमळेकर, डॉ. शालिनी सिन्हा, डॉ. संजय जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकसेवक कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रफितीच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला.

यावेळी आपल्या मनोगतात माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणून केलेल्या अतुलनीय आणि दूरदृष्टीपूर्ण कार्याचा विशेष उल्लेख केला. राज्यातील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तर डॉ. मधुमिता पाटील यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब चौधरी यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या कारकिर्दीत अर्थ, नियोजन, नगरविकास, महसूल यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी भूषविली; मात्र शिक्षण हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय होता. शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १५ मान्यवरांना ‘ज्ञानश्री २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा. जगदीश घनश्याम खरात यांचा समावेश आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या