Monday, November 9, 2026
Homeक्राईमदिवाळीच्या उत्साहात खुनाची थरारक घटना; जळके शिवारात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला!

दिवाळीच्या उत्साहात खुनाची थरारक घटना; जळके शिवारात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला!

दिवाळीच्या उत्साहात खुनाची थरारक घटना; जळके शिवारात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच जळगाव तालुक्यातील जळके शिवारात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगडाने किंवा धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ९) दुपारी उघडकीस आली. गोरख विठ्ठल ठाकूर (वय ५५, रा. अंतुर्ली, हल्ली मुक्काम पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे जळके परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोरख ठाकूर हे पुणे येथे वास्तव्यास होते. गेल्या आठ दिवसांपासून ते शिरसोली येथील त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर यांच्याकडे आले होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या जळगाव तालुक्यातील जळके शिवारात असलेल्या शेतात गेले होते. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर दगडाने अथवा धारदार हत्याराने जोरदार वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, शेतात काहीतरी वाद सुरू असल्याची माहिती संशयिताच्या नातेवाईकाकडून घरी देण्यात आल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणात प्राथमिक स्तरावर मुकुंदा पाटील याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमका वाद कोणत्या कारणावरून झाला, हत्येमागील कारण काय आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली.
दरम्यान, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या