नैसर्गिक उपचार परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी ‘उत्तम प्राकृतिक आरोग्य निधी’ पुरस्काराने गौरव; देशभरातील संत-महंतांची उपस्थिती!
फैजपूर खान्देश लाईव्ह प्रतिनिधी – ऋषीमुनींनी दिलेल्या प्राचीन नैसर्गिक उपचार परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फैजपूर येथील ‘तुलसी हेल्थ केअर सेंटर’ या संस्थेचा वाराणसी (काशी) येथे आयोजित तीन दिवसीय संस्कृती संसदेत भव्य सन्मान करण्यात आला. देशभरातील नामवंत संत-महंत, महामंडलेश्वर आणि हिंदू संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संस्थेला प्रतिष्ठेचा ‘उत्तम प्राकृतिक आरोग्य निधी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवामुळे फैजपूरसह संपूर्ण खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार, सतपंथरत्न ज्येष्ठ महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी स्थापन केलेले ‘तुलसी हेल्थ केअर सेंटर’ गेल्या काही काळापासून पारंपरिक नैसर्गिक उपचार पद्धतींचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत ‘सुख शांती समृद्धी पत्रिका’, ‘विश्व विद्यापीठ महानुभाव समिती’ आणि ‘विश्व समाज रत्न महासंघ’ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आजच्या धकाधकीच्या जीवनात नैसर्गिक उपचार पद्धतींचे महत्त्व वाढत असून, शरीरशुद्धी आणि आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने या उपचारांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या पद्धतीने आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तुलसी हेल्थ केअर सेंटर कार्यरत आहे. संस्थेच्या या कार्याला देशभरातील संत-महंतांकडूनही प्रशंसा मिळत आहे.वाराणसी येथे आयोजित तीन दिवसीय संस्कृती संसदेत ज्येष्ठ संतांच्या हस्ते व्यासपीठावरून संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वैष्णवसम्राट मोहनदासजी महाराज, ज्येष्ठ पत्रकार जितू सोमपुरा, महामंडलेश्वर राधे राधे बाबा मनमोहनदासजी महाराज (इंदूर), संत समितीचे सहसरचिटणीस डॉ. काशी सुमेरू, पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, निर्वाण पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी विशोकानंदजी महाराज, सत्पंथरत्न जनार्दन हरिजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामकमलाचार्य वेदांतीजी महाराज, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्यजी महाराज, जगद्गुरू श्री नरसिंह देवाचार्यजी महाराज (जबलपूर), ब्रह्मचारी गिरीश महर्षी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष अविचल देवाचार्यजी महाराज, सरचिटणीस जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख सदस्य चम्पत राय यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रतिनिधी, आचार्य महामंडलेश्वर, संत समितीचे पदाधिकारी आणि देशभरातील संत-महंतांनी या संसदेत सहभाग घेतला.
या तीन दिवसीय संस्कृती संसदेत भारतीय संस्कृती, राष्ट्रचिंतन, धार्मिक परंपरा आणि सामाजिक विषयांवर विद्वत परिषदेत विचारमंथन करण्यात आले. देशातील विविध राज्यांतील संत समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी, काशी विद्वत परिषदेचे प्रतिनिधी आणि युवा समाजाचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना यापूर्वी तुलसी हेल्थ केअर सेंटरच्या उपचारांचा लाभ घेतलेल्या विविध महामंडलेश्वर आणि संतांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. नैसर्गिक उपचार पद्धतींचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.फैजपूर येथील संस्थेला वाराणसीसारख्या आध्यात्मिक नगरीत राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा सन्मान संस्थेच्या कार्याची दखल घेणारा ठरला असून, या यशामुळे फैजपूर आणि खान्देशच्या नावलौकिकात भर पडली आहे.