स्व. आमदार आर. आर. पाटील यांच्या जयंती निमित्त थोरगव्हाण येथे २१ नोव्हेंबरला भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर!

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध आजारांची तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन; गोदावरी फाउंडेशन आणि डी. एस. देशमुख विद्यालयाचा संयुक्त उपक्रम
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण माजी अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंती निमित्त शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी थोरगव्हाण येथे भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण आणि गोदावरी फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विद्यालयाच्या परिसरात हे शिबिर होणार आहे.
स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी सार्वजनिक जीवनात सामाजिक बांधिलकी, लोकाभिमुख कार्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या स्मृती जपण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याचा उद्देश या शिबिरामागे आहे. मागील वर्षी त्यांच्या जयंती निमित्त ‘जागर संविधानाचा, संकल्प व्यसनमुक्तीचा’ हा सामाजिक प्रबोधनाचा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
**विविध आजारांची तपासणी व वैद्यकीय सुविधा**
या शिबिरात हृदयरोग विभागांतर्गत ईसीजी, कार्डिओग्राफी, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच हृदयविकारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर, रिनल अँजिओप्लास्टी, आय.व्ही.सी. फिल्टर व बायपास यांसारख्या उपचारांबाबतही माहिती दिली जाणार आहे.
नाक-कान-घसा विभागात कानाचा पडदा, टॉन्सिल व नाकाचे हाड यासंबंधी तपासणी, नेत्ररोग विभागात मोतीबिंदू व तिरळेपणासंबंधी तपासणी, तर स्त्रीरोग विभागात गर्भाशयाच्या विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात येतील.
अस्थिरोग विभागात सांधेदुखी, फ्रॅक्चर, कंबरदुखी, संधिवात, हाडांची झीज, हाडे ठिसूळ होणे, अपघात व मणक्याच्या विकारांवर तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्वचारोग विभागात मुरूम, पुरळ, खाज, खरूज, इसब, गजकर्ण, नायटा, केस गळणे व त्वचेसंबंधी विविध समस्यांवर तपासणी होणार आहे.
शस्त्रक्रिया विभागांतर्गत मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे, थायरॉईड, मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिक्स व हायड्रोसिल यांसारख्या आजारांवर तपासणी व उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
जनरल मेडिसिन विभागात यकृत, पित्ताशय, पोट, किडनी, फुफ्फुसे व कावीळ यांसंबंधीच्या आजारांची तपासणी करण्यात येईल. मानसोपचार विभागात तणाव, नैराश्य, झोपेच्या समस्या, चिंता, भीती व व्यसनाधीनता यांसारख्या समस्यांवर समुपदेशन व मार्गदर्शन उपलब्ध असेल.
**शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन**
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. शासकीय योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियाही सवलतीच्या दरात करून देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
**दी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीचा पुढाकार**
दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाणचे अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत वसंत बाऊसकर, सचिव पवन हेमंत चौधरी आणि सहसचिव रामराव माधवराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
सोसायटीच्या संचालक मंडळातील रजनीताई रामकृष्ण पाटील, चंद्रकांत गंगाधर देशमुख, राजेंद्र पुरुषोत्तम देशमुख, प्रकाश काशिनाथ बाऊसकर, कमलाकर त्र्यंबक चौधरी, नंदकुमार एकनाथराव चौधरी, मधुकर वसंत कोल्हे, संजय हरिभाऊ चौधरी, चंद्रकांत सुराजी पाटील, रवींद्र काशिनाथ चौधरी आणि दिनेश भागवतराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत.
**वाहतूक व भोजनाची व्यवस्था**
थोरगव्हाण व परिसरातील गावांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शिबिरार्थींसाठी चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव यांचे वैद्यकीय सहकार्य लाभणार आहे.
**शिबिरासाठी संपर्क :**
१. आशिष भिरुड – ९३७३३५०००९
२. रत्नशेखर जैन – ७०३०५७११११
३. के. एम. पाटील – ९७६४४९४२०९
४. आर. के. वानखेडे – ९१७२०९५९६४
ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणारे हे शिबिर सामाजिक आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

