दिवाळीच्या नावाखाली अधिकाऱ्यांना घेरणाऱ्या भामट्यांवर कारवाई कधी?
यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – दिवाळी हा सण आनंदाचा, प्रकाशाचा, आपुलकीचा. पण गेल्या काही वर्षांत हा सण काही जणांसाठी ‘वसुलीचा हंगाम’ बनलाय. गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरणारे, हातात माईक घेऊन दमदाटी करणारे, स्वतःलाच ‘पत्रकार’ म्हणवून घेणारे खंडणीखोर सध्या प्रत्येक कार्यालय, प्रत्येक पोलीस ठाणे, प्रत्येक नगरपालिका, तहसील कार्यालयात धडकताना दिसत आहेत.
बातम्यांशी यांचं नातं नाही, फक्त ‘लिफाफ्याशी’ देणंघेणं आहे!
पत्रकारिता की दिवाळीची ‘वसुली’?खरा पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. तो प्रश्न विचारतो, सत्य मांडतो, अन्यायाविरुद्ध लढतो. पण हे स्वयंघोषित पत्रकार….यांच्याकडे ना कोणत्या मान्यताप्राप्त वृत्तपत्राचे नियुक्तीपत्र, ना प्रेस कौन्सिल ची मान्यता, ना कोणती बातमी! यांच्याकडे असतो तो फक्त एक ‘PRESS’ लिहिलेला गळ्यातला बिल्ला, एक फेसबुक पेज, एक युट्यूब चॅनल आणि एक व्हॉट्सअॅप ग्रुप! दिवाळी आली की यांचा ‘दौरा’ सुरू होतो. सकाळी एका कार्यालयात, दुपारी दुसऱ्या कार्यालयात, संध्याकाळी पोलीस ठाण्यात… “साहेब, दिवाळी अंकासाठी जाहिरात द्या”, “साहेब, दिवाळी भेट द्या”, “साहेब, आमचा सन्मान ठेवा, नाहीतर…” ही भाषा आता अधिकाऱ्यांना नवी राहिलेली नाही.
डिजिटल युगातील नवीन ‘ब्लॅकमेलर्स’!
पूर्वी खंडणीखोर गल्लीत फिरायचे, आता ते मोबाईल घेऊन फिरतात. एखाद्या अधिकाऱ्याचा फोटो काढायचा, अर्धवट माहितीवर व्हिडिओ बनवायचा, “उद्या तुमची बातमी लावतो” म्हणून धमकवायचं आणि मग लिफाफा घेऊन गप्प बसायचं. हाच यांचा धंदा! काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी बिकट आहे की, काही पोलीस अधिकारी चापलूसी, हुजरेगिरी आणि मध्यस्थी करणाऱ्यांना दरमहा पाकीट देतात, असा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. काम करून घेण्यासाठी, बदली वाचवण्यासाठी, वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी या दलालांना महिन्याला ‘पाकीट’ दिलं जातं. आणि हे पाकीट घेणारे दलालच मग ‘आम्ही साहेबांचे जवळचे आहोत’ सांगून सामान्य माणसाला लुटतात.म्हणजेच, एकीकडे दिवाळी वसुली करणारे भामटे आणि दुसरीकडे त्यांना महिन्याला पाकीट देणारे अधिकारी… यात भरडला जातो तो सामान्य नागरिक!
अधिकारी वैतागले, पण बोलणार कोण?
अनेक प्रामाणिक अधिकारी या त्रासाला कंटाळले आहेत. “दिवाळी आली की कार्यालय सोडून जावं वाटतं,” असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. कारण, दिलं नाही तर बदनामीची धमकी आणि दिलं तर भ्रष्टाचाराचा आरोप… दोन्ही बाजूंनी अडकले आहेत प्रामाणिक अधिकारी. पण प्रश्न असा आहे की, या बनावट पत्रकारांना खतपाणी कोण घालतं? त्यांना कार्यालयात प्रवेश कोण देतं? त्यांच्या धमक्यांना घाबरून लिफाफा कोण देतं? आता कारवाई कधी?
- खऱ्या पत्रकारांनीच पुढे यावं: मान्यताप्राप्त पत्रकार संघटनांनी या भामट्यांची यादी जाहीर करावी. खरा आणि खोटा यातला फरक जनतेला कळलाच पाहिजे.
- पोलिसांनी तपासणी करावी: गळ्यात PRESS बिल्ला लावून फिरणाऱ्याचं ओळखपत्र खरं आहे का? तो कोणत्या वृत्तसंस्थेसाठी काम करतो? याची पडताळणी झालीच पाहिजे.
- अधिकाऱ्यांनी धाडस दाखवावं: धमकी देणाऱ्याला लिफाफा देण्याऐवजी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली तरच हा धंदा बंद होईल.
- दरमहा पाकीट संस्कृती बंद करा: चापलूसी करणाऱ्यांना, मध्यस्थांना पाकीट देण्याची पद्धत बंद झाली नाही, तर भ्रष्टाचार कधीच संपणार नाही. दिवाळी हा लाचेचा, वसुलीचा सण नाही. तो प्रकाशाचा सण आहे.
या प्रकाशात या अंधारातल्या भामट्यांचे चेहरे उघड झाले पाहिजेत.बातम्यांशी नातं नाही, फक्त ‘लिफाफ्याशी’ देणंघेणं असणाऱ्या या खंडणीखोरांचा सुळसुळाट थांबवायचा असेल, तर आता सामान्य जनतेनेच, प्रामाणिक अधिकाऱ्यांनी आणि खऱ्या पत्रकारांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे!


