भुसावळ पोलीस उपविभागात ‘ऑपरेशन ऑल आउट’ची धडक मोहीम; अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा
हातभट्टी दारूचे ६ गुन्हे, जुगाराचे ६ गुन्हे दाखल; ५ हद्दपार आरोपींवर कारवाई, ८३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : भुसावळ पोलीस उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत बाजारपेठ, शहर, नाशिराबाद आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी विविध ठिकाणी तपासणी व कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत अवैध गावठी हातभट्टी दारूविक्रीप्रकरणी ६ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये १५८ लिटर गावठी दारू तसेच ८० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. देशी व विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी आणखी २ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण ८ आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

