Monday, November 16, 2026
Homeजळगावभुसावळ येथील तापी नदीच्या तीरावर छटपूजेचा उत्साह; पाच ते सहा हजार भाविकांची...

भुसावळ येथील तापी नदीच्या तीरावर छटपूजेचा उत्साह; पाच ते सहा हजार भाविकांची उपस्थिती!

भुसावळ येथील तापी नदीच्या तीरावर छटपूजेचा उत्साह; पाच ते सहा हजार भाविकांची उपस्थिती!

महिलांनी नदीपात्रात उतरून केली विधिवत पूजा;
उत्तर भारतीय बांधवांनी जपली परंपरा

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
छट पूजा महोत्सवानिमित्त भुसावळ शहरातील उत्तर भारतीय समाजाच्या वतीने फिल्टर हाऊस परिसरातील तापी नदीच्या काठावर भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सायंकाळी जवळपास पाच ते सहा हजार भाविकांनी एकत्र येत श्रद्धा आणि भक्तिभावाने छटपूजेचे विधिवत पूजन केले. या सोहळ्यामुळे तापी नदीचा परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता. यावेळी समितीचे अध्यक्ष विक्रांतसिंह राजपूत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

छटपूजेच्या निमित्ताने महिला भाविकांनी तापी नदीच्या पात्रात उतरून पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली. सूर्यदेव आणि छठी मातेची आराधना करत महिलांनी धार्मिक विधी पूर्ण केले. नदीकाठावर मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. कुटुंबीयांसह आलेल्या नागरिकांमध्ये या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

भुसावळ छट पूजा समितीच्या वतीने नदीकाठावर आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. तसेच परिसरात आकर्षक सजावट आणि पूजेची व्यवस्था करण्यात आली होती. उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात विशेषतः रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच आयुध निर्माणी भुसावळ येथील अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उत्तर भारतीय समाजातील नागरिकांनी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करत हा उत्सव उत्साहात साजरा केला.

यावेळी भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, परिक्षीत बऱ्हाटे, किरण कोलते , भाजप शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, पुरूषोत्तम नारखेडे यांच्यासह रेल्वेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

छटपूजेच्या निमित्ताने तापी नदीच्या तीरावर झालेल्या या भव्य सोहळ्याने भुसावळमधील सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडविले. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
सदर ठिकाणी पूजाअर्चा केल्यानंतर पूजेसाठी वापरलेले साहित्य अनुयायी घरी घेऊन गेले. तर नदीपात्रात पूजेसाठी उतरलेल्या महिलांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित दिसून आले नाहीत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या