यावल येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन,स्मृतिदिन उत्साहात साजरा.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी , दि. १७
यावल येथील शिवसेना कार्यालयात हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील,माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांच्यासह यावल शहर व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.
“वाघ पुन्हा होणे नाही” – जगदीश कवडीवाले यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले,
“१७ नोव्हेंबर २०१२ तो दिवस आठवला की आजही डोळे पाणावतात. कारण त्या दिवशी फक्त एक नेता नव्हता, तर अवघ्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज शांत झाला होता. ज्यांनी कधी सत्तेपेक्षा स्वाभिमानाला महत्त्व दिलं,ज्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणसाच्या मनात स्थान निर्माण केलं,ज्यांनी मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं, असा वाघ पुन्हा होणे नाही.”
“आजही तुमचा तो आवाज कानात घुमतो – ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’. साहेब, आजही लाखो लोकांच्या मनात तुमच्यासाठी तेवढंच प्रेम आहे. तुम्ही गेलात पण तुमचा दरारा गेला नाही, तुम्ही थांबलात पण तुमचे विचार थांबले नाहीत. काळ बदलला,पिढ्या बदलल्या, पण महाराष्ट्राच्या मनातील तुमचं स्थान कधीच बदलणार नाही. साहेब,तुम्ही असायला हवे होतात.”
“हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन, जय महाराष्ट्र!”
त्यांच्या या भावनिक मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला नगरसेवक सागर चौधरी,निलेश बारी,शरद कोळी,संतोष खर्चे,कडू पाटील, मनोज करणकर,मयूर खर्चे, योगेश पाटील,राहुल उर्फ गागा पवार,विजय पंडित,सागर देवांग, गौरव जोशी,राहुल कचरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या विचारांचा जागर ठेवण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या हिंदुत्व व मराठी स्वाभिमानाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत शिस्तबद्ध, भावनिक आणि उत्साही होते.

