Monday, November 23, 2026
Homeआरोग्यदेहदानाचा संकल्प करणाऱ्या प्रवीण चौधरींचा निर्णय ठरला महाआरोग्य शिबिराचे मुख्य आकर्षण!

देहदानाचा संकल्प करणाऱ्या प्रवीण चौधरींचा निर्णय ठरला महाआरोग्य शिबिराचे मुख्य आकर्षण!

देहदानाचा संकल्प करणाऱ्या प्रवीण चौधरींचा निर्णय ठरला महाआरोग्य शिबिराचे मुख्य आकर्षण!
स्व. माजी आमदार आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त डी. एस. देशमुख विद्यालयात महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

सावदा   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

थोरगव्हाण येथे स्व. माजी आमदार रामकृष्ण रघुनाथराव (आर. आर.) पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. एज्युकेशन सोसायटी संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जनार्दन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती रजनीताई रामकृष्ण पाटील, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री. एम. आर. पाटील, सेवानिवृत्त ज्येष्ठ लेखनिक श्री. ए. पी. पाटील आणि विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. व्ही. पाटील, श्री वाय एम बोरोले उपस्थित होते.
या महाआरोग्य तपासणी शिबिरात डॉ. उल्हास पाटील धर्मादाय रुग्णालय, जळगाव यांच्या वैद्यकीय पथकाने सहभाग नोंदविला. विविध आरोग्य तपासणी विभागांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील अनेक गावांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत वैद्यकीय पथकाने आवश्यक मार्गदर्शन केले.
देहदानाचा संकल्प ठरला शिबिराचे प्रेरणादायी वैशिष्ट्य!
या शिबिराचे सर्वांत मोठे आणि प्रेरणादायी आकर्षण ठरले ते थोरगव्हाण येथील प्रवीण अरविंद चौधरी यांनी केलेला देहदानाचा संकल्प. कोरोना काळात डोळ्यांची दृष्टी गमावलेली असतानाही त्यांनी समाजहिताचा अत्यंत उदात्त निर्णय घेतला. स्वतःच्या स्वाक्षरीने देहदानाचे संकल्पपत्र उपस्थितांसमोर भरून दिले. यावेळी त्यांच्या भगिनी सौ. छाया राजेंद्र झोपे आणि भाची कु. मुकुला राजेंद्र झोपे उपस्थित होत्या. त्यांच्या आई व पत्नी यांनीही देहदानाचा संकल्प केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
विशेष म्हणजे, प्रवीण अरविंद चौधरी यांनी आतापर्यंत जवळपास ३५ व्यक्तींचे नेत्रदान घडवून आणले असून सहा व्यक्तींचे देहदानही घडवून आणले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यातून मरणोत्तरही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचा आणि वैद्यकीय क्षेत्राला मोलाचे योगदान देण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.
प्रवीण चौधरी यांच्या या कार्याचे आणि स्वतः देहदानाचा संकल्प करण्याच्या निर्णयाचे उपस्थितांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले. स्व. आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी घेतलेला हा संकल्प म्हणजे समाजोपयोगी कार्यातून वाहिलेली अनोखी श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन!
आरोग्य तपासणीबरोबरच रक्तदान उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव श्री. हेमाक्ष रामकृष्ण पाटील, संस्थेचे सचिव श्री. पवन चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील, शिक्षक श्री. एम. के. पाटील, श्री. के. एम. पाटील, श्री. एस. बी. सपकाळे आणि श्री. समीर नंदकुमार चौधरी यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. याशिवाय दि. एज्युकेशन सोसायटीचे शिक्षकवृंद, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, संस्थाचालक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनीही रक्तदानात सहभाग नोंदविला. या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता आणि सेवाभावाचे दर्शन घडले.
शिबिरासाठी पंचक्रोशीतील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ घेणे सुलभ झाले.
याप्रसंगी स्व. आर. आर. पाटील यांच्या पत्नी श्रीमती रजनीताई पाटील, त्यांचे पुत्र श्री. हेमाक्ष रामकृष्ण पाटील, संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष श्री. उमाकांत बाऊस्कर, सचिव श्री. पवन चौधरी, कार्यकारी मंडळाच्या श्रीमती रजनीताई पाटील, श्री. नंदकुमार चौधरी, श्री. मधुकर कोल्हे, एस एच चौधरी,श्री. रवींद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री. वाय. जे. कुरकुरे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर श्री. एम. के. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
डॉ. उल्हास पाटील धर्मादाय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे नियोजनबद्ध कार्य, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे हे महाआरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. आरोग्यसेवा, रक्तदान आणि देहदानाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या