भुसावळ बसस्थानकासमोर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला
वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे; ओळख पटविण्यासाठी बाजारपेठ पोलिसांचे आवाहन
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ शहरातील बसस्थानकासमोरील मोकळ्या जागेत अंदाजे ६० ते ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना २० मे २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृताची ओळख आणि त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बसस्थानकासमोरील मोकळ्या जागेत मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, भुसावळ येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी १२.१५ वाजता त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे असून, अंगात राखाडी रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. कमरेला हिरव्या रंगाचा करदोडा असून, केस काळे-पांढरे आणि दाढी वाढलेली आहे. या वर्णनावरून नागरिकांनी मृताची ओळख पटविण्यास मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्ती कोणाच्या परिचयाची किंवा नातेवाईक असल्यास बाजारपेठ पोलीस स्टेशनशी ०२५८२-२२२३९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

