डंपरच्या रिव्हर्सचा काळ ठरला! आजोबाचा जागीच मृत्यू

संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला
चार वर्षांची चिमुरडी थोडक्यात बचावली; पिंपरीसेकम शिवारातील भीषण अपघाताने परिसर हादरला
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील पिंपरी सेकम शेती शिवारात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. अरुंद रस्त्यावर डंपर मागे घेत असताना दुचाकीला जोरदार धडक बसून दुचाकी डंपरखाली दबली. या दुर्घटनेत ५५ वर्षीय आनंदा मुकुंद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली अवघ्या चार वर्षांची नात परी मात्र सुदैवाने बचावली. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत डंपर पेटवून दिला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
रिव्हर्स घेताना काळाचा घाला!
मिळालेल्या माहितीनुसार, तपट कठोरा येथील रहिवासी आनंदा मुकुंद पाटील हे आपल्या चार वर्षांच्या नातीसह शेती शिवारात गेले होते. शिवारातील रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी एमएच १९-३७३७ क्रमांकाचा डंपर आला होता. अरुंद रस्त्यावर चालक डंपर मागे घेत असताना मागील बाजूस असलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली. यात दुचाकीसह आनंदा पाटील डंपरखाली दबले गेले. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तर चिमुरडी परी सुदैवाने बचावली.
अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप; डंपर पेटवला!
अपघाताची वार्ता गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरखाली दबलेली दुचाकी आणि आनंदा पाटील यांना तातडीने वरणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी डंपरला आग लावून दिली. पाहता पाहता डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात
डंपर पेटवून दिल्याची माहिती मिळताच वरणगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंबाच्या मदतीने डंपरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावावर शोककळा पसरली आहे.
वरणगाव पोलिसांकडून कारवाई सुरू
या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू, चार वर्षांच्या चिमुरडीचे थोडक्यात बचावणे आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवून देण्याची घटना यामुळे पिंपरी सेकम परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

