एनसीएमएस कार्डमध्ये बॅलन्स असूनही ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट घेण्याची सक्ती!

‘पैसे नसतील तर खाली उतरा’; एसटी कंडक्टरच्या अरेरावीविरोधात मनसे आक्रमक, कारवाईची मागणी !
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक आणि योग्य सुविधा देणे अपेक्षित असताना, एका ज्येष्ठ नागरिकाला कंडक्टरच्या कथित उद्धट वागणुकीचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. एनसीएमएस (NCMS) कार्डमध्ये बॅलन्स असतानाही कार्डचा वापर न करता पूर्ण तिकीट काढण्याची सक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदूर येथील ज्येष्ठ नागरिक मोहन चुनिलाल भोई (वय ७०) हे भुसावळ ते मुक्ताईनगर असा एसटी बसने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्याकडे एनसीएमएस कार्ड क्रमांक 818111002176 उपलब्ध होते. मात्र, संबंधित कंडक्टरने मशीन डिफॉल्ट असल्याचे कारण देत कार्डचा वापर करण्यास नकार दिला. तसेच, ‘पैसे नसतील तर खाली उतरून जा,’ अशा उद्धट भाषेत संभाषण केल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकाने केला आहे.विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीनुसार भुसावळ ते मुक्ताईनगर प्रवासासाठी ५० रुपये तिकीट अपेक्षित असताना त्यांना १०० रुपयांचे पूर्ण तिकीट काढण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित कंडक्टर एम. पी. महाले (बिल्ला क्रमांक AKLCBS56, कर्मचारी क्रमांक 52773, आगर डेपो अकोला) यांनी अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकाराची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली असून, संबंधित कंडक्टरवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन आगरप्रमुख मुक्ताईनगर यांच्यासह एसटी महामंडळाचे जळगाव येथील मुख्य कार्यालय आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखा, अन्यथा मनसेचा इशारा!
एनसीएमएस कार्डमध्ये बॅलन्स किंवा टॉपअपची अडचण असल्यास प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करावे. आवश्यक असल्यास रिचार्ज करून घेण्यास सांगावे किंवा नियमानुसार आधारकार्डच्या आधारे सवलतीचे तिकीट देऊन सहकार्य करावे. मात्र, प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरणे आणि पूर्ण तिकीट घेण्याची सक्ती करणे चुकीचे असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अशा घटना यापुढे खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी मुक्ताईनगर मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोळी, हरताळा गट उपाध्यक्ष सुनील कोळी, प्रहार सेनेचे तालुका उपाध्यक्ष उत्तम जुमडे, गणेश पाटील, संजीव सोनवणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

