जामनेर रोडवरील हॉटेल चेतनसमोर घटना; अपघातानंतर वाहनचालक फरार, अज्ञात वाहनाविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : शहरातील जामनेर रोडवर मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संदीप मधुकर बऱ्हाटे (वय ४१, रा. सरस्वती नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास संदीप बऱ्हाटे हे जामनेर रोडवरील हॉटेल चेतनसमोरून पायी जात होते. यावेळी तेथून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातात बऱ्हाटे यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाताची नोंद केली.
याप्रकरणी ऋषभ सुरेश बऱ्हाटे (रा. चोरवड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सहायक फौजदार जयेंद्र पगारे करीत आहेत.