यावलच्या ऐतिहासिक निंबाळकर किल्ल्याची भिंत कोसळली!

संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा धोक; किल्ल्यालगतच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. २६
यावल शहरातील अति प्राचीन ऐतिहासिक निंबाळकर किल्ल्याची भिंत गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजेच्या दरम्यान अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.मात्र, ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेचा आणि किल्ल्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
यावल न्यायालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर, तर नगर परिषद कार्यालयापासून सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावर हा ऐतिहासिक किल्ला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली.
किल्ल्यालगतच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
या किल्ल्याच्या भिंतीलगत अंदाजे १०० ते १२५ कच्ची व पक्की निवासी घरे असल्याची माहिती आहे.त्यामुळे भिंतीचा आणखी काही भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीने संपूर्ण किल्ल्याच्या भिंतीचे तांत्रिक परीक्षण करून धोकादायक भाग निश्चित करणे आवश्यक आहे.
गरज भासल्यास किल्ल्यालगतच्या रहिवाशांना तात्पुरत्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
न्यायालयाच्या इमारतीबाबतही स्ट्रक्चरल ऑडिटचा विषय
किल्ल्याच्या बांधकामाची दयनीय अवस्था लक्षात घेता यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याची माहिती आहे.संबंधित बांधकाम विभागाच्या अहवालानुसार यावल न्यायालयातील दोन न्यायालयांपैकी एक न्यायालय बंद करण्यात आले असून दुसरे न्यायालय सुरू आहे. न्यायालयासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही शासकीय स्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते.
ऐतिहासिक वारसा जपणार कोण?
निंबाळकरांचा हा प्राचीन किल्ला यावलच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा ठेवा आहे.अशा ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाची औपचारिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठी इतिहास जतन करण्याचीही गरज आहे.

या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभाग, महसूल विभाग,नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे किल्ल्याची पाहणी करून भिंतींची सद्यस्थिती,उर्वरित बांधकामाची स्थिरता आणि नागरिकांना असलेला संभाव्य धोका याबाबत तज्ज्ञांकडून अहवाल तयार करणे आवश्यक आहे.
तसेच किल्ल्यालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत नगर परिषद, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने यापूर्वी कोणती लेखी कार्यवाही केली आहे? धोकादायक बांधकामांबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत का ? आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतराची व्यवस्था काय आहे ? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे प्रशासनाकडून मिळणे गरजेचे आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयातील उपस्थितीचा मुद्दाही चर्चेत
पहाटे घडलेल्या या घटनेनंतर आपत्कालीन परिस्थितीत महसूल व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी किती तत्परतेने घटनास्थळी पोहोचू शकतात,तसेच मुख्यालयी वास्तव्यासंबंधीच्या नियमांचे पालन होते का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी होत आहे.
ऐतिहासिक किल्ल्याची भिंत कोसळल्यानंतर केवळ पडलेला ढिगारा हटविणे पुरेसे ठरणार नाही.संपूर्ण किल्ल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट,धोकादायक भागाचे संरक्षण,रहिवाशांच्या सुरक्षिततेची पर्यायी व्यवस्था आणि ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे.
आज सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने संभाव्य धोक्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,अशी अपेक्षा यावलकरांकडून व्यक्त होत आहे.

