शेख फिरोज रेहमान यांची रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्ब्ली ऑफ महाराष्ट्राची महत्त्वपूर्ण जबाबदारी; संस्थापक आसिफ शेख रशीद यांच्या शिफारशीनुसार निवड
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी : इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्ब्ली ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील शेख फिरोज रेहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक तथा मालेगावचे माजी आमदार जनाब आसिफ शेख रशीद यांच्या शिफारशीनुसार संघटनेच्या नेतृत्वाने एकमताने त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. कुरेश शेख शब्बीर यांनी दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.
शेख फिरोज रेहमान हे भुसावळ शहरातील जाम मोहल्ला, भिस्ती गल्ली परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची तळमळ, संघटनेच्या विचारधारेप्रती निष्ठा आणि जनसेवेची भावना लक्षात घेऊन त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता, सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करणे, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणे, ही प्रमुख जबाबदारी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांवर राहणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करणे, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखणे आणि जनहिताचे उपक्रम राबविणे यासाठी त्यांनी सक्रियपणे पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे भुसावळ शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, शेख फिरोज रेहमान यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रावेर लोकसभा क्षेत्रात संघटनेची ताकद वाढून सामाजिक व जनहिताच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


