पाल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा..!


पाल ता.रावेर प्रतिनिधी (पूनमचंद जाधव) – दि.१५ ऑक्टोबर भारताचे लाडके माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाढदिवस .अब्दुल कलाम यांना पुस्तक वाचायला आवडत असे ,त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या स्मरणार्थ जयंती दिनी म्हणजे १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.मुलांना वाचन करण्याचे महत्त्व समजावे आणि छंद म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज ग्रंथालयातील काही जुन्या पुस्तकांची शिस्तबध्द मांडणी करून ती सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली.आज या निमित्ताने सर्वांनी हे ग्रंथ पाहून त्यांची माहिती करून घ्यावी हा या मागील उद्देश होता.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. हितेश फिरके यांनी केले. डॉ.कलाम यांनी देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते.डॉ.कमाल यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे ,त्यामुळे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांची पुस्तके वाचावीत.वाचनामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो,त्यांची आकलन शक्ती वाढते,यासाठी असे उपक्रम राबविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असणार असल्याचे प्रा. फिरके यांनी यावेळी म्हटले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.सी.पी.गाढे आपल्या मनोगतात म्हणाले की,वाचन ही अशी सिध्दी आहे की,त्यामुळे आपल्याला एका हयातीत अनेक आयुष्य जगता येतात.आपण खंर तर वेळ जात नाही म्हणून वाचन करण्यापेक्षा वाचन करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. वाचन लहानपणी ज्ञान देण्याचे काम करते.तारुण्यात शील रक्षणासाठी विवेक आणि सदभावना निर्माण करण्याचे काम करते आणि वार्धक्याच्या काळात दु:ख हरण करून आनंद देण्याचे काम करते असे प्रतिपादन प्रा.गाढे यांनी यावेळी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.नफिसा तडवी यांनी केले. यावेळी प्रा. शाहरुख तडवी,प्रा. आशिष जहुरे,प्रा.विद्या जंगले,राजू नाथबाबा आदी उपस्थित होते. मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती जपावी हा संदेश देत या कार्यक्रमाची सांगता झाली.

