शेतात कापूस वेचणीसाठी गेलेला शेतकरी मधमाशांच्या हल्ल्यात ठार !


जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या दाम्पत्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास चुडामण पाटील (वय ५५, रा. वडली, ता. जळगाव) यांचा रुग्णालयात आणत असतांना वाटेतच मृत्यू झाला, तर रत्ना विकास पाटील (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या आहेत,
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता जवखेडा शिवारात घडली आहे.तालुक्यातील वडली येथील रहिवाशी असलेले विकास पाटील यांची शेती शेजारील जवखेडा शिवारात गट नंबर ८२/१/२ मध्ये आहे. सकाळी साडे दहा वाजता पती-पत्नी शेतात कापूस वेचणीसाठी गेले होते. शेतातील झाडावर असलेल्या मधमाशांनी पाटील दाम्पत्यावर अचानक हल्ला चढविला. त्यामुळे ते दोघे शेतात पळत सुटले. मधमाशांनी विकास पाटील यांच्या संपुर्ण शरिरावर चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती रत्ना पाटील यांनी त्यांचे जेठ शिवाजी पाटील यांना दिल्यानंतर ते लागलीच शेतात आले. विकास यांच्या पश्चात पत्नी, हितेश व सागर अशी दोन मुले आहेत. दोघंही अविवाहित आहेत. मधमशांच्या हल्ल्यात विकास पाटील यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांनी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याला तातडीने जळगावला दवाखान्यात हलविले. मात्र विकास यांचा रुग्णालयात येण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मधमाशांनी जीभेवर चावा घेतल्याने विकास यांची जीभ सुजली होती. रत्ना यांच्या तोंडावर, हातावर व शरीरावर माशांनी चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

