शेतात लागली आग : शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेतातील कडब्याला आग लागून या आगीत पंडित डोमन रायसिंग (६५) या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अनवर्दे खुर्द, ता. चोपडा येथे शनिवारी दुपारी उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शेतकरी पंडित रायसिंग हे शनिवारी सकाळी हातेड शिवारातील आपल्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेतातील कडब्याला अचानक आग लागली. ते धुराच्या व आगीच्या तडाख्यात सापडल्याने होरपळून जमिनीवर कोसळले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंडित हे दुपारपर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे घरातील मुले त्यांना बघायला शेतात गेली असता ते जळालेल्या व मयत स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच भाऊबंदांनी शेताकडे धाव घेत मृतदेह घरी आणला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली, असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि.१८ रोजी सकाळी १० वाजता अनवर्दे खुर्द येथून निघणार आहे