तर श्रद्धेय स्वर्गीय हरिभाऊ आज कृषीमंत्री असते…..!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ज्या जनतेने आपल्याला त्यांचे एक एक मत देऊन विधिमंडळात पाठविले आहे त्या जनतेप्रति आपण शंभर टक्के बांधिल असले पाहिजे. २४ तास त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. याच विचाराने रावेरचे माजी खासदार आणि आमदार राहिलेले स्वर्गीय हरिभाऊ जवळपास २० वर्षे जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात कार्यरत राहिले.रसायनशास्त्राचे पदवीधर असलेले स्वर्गीय हरिभाऊ स्वभावाने शांत , संवेदनशील हळवे आणि चारित्र्यशील नेते होते. आपल्या हातून एक काम कमी झाले तरी चालेल परंतु त्या कामाने कुणावर अन्याय होता कामा नये, कुणाच्या भावना दुखावता कामा नये, आपल्या चारित्र्यावर कुठलाही वाईट गोष्टींचा डाग पडता कामा नये यासाठी भाऊ आयुष्यभर आपल्या सार्वजनिक जीवनातील लोकप्रतिनिधीच्या प्रतिमेला सांभाळीत राहिले. वैचारिक मतभेदांच्या पलीकडेही माणुसकीचे श्रेष्ठ नाते असते ते नाते हरिभाऊंनी आयुष्यभर जपले.
१९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत यावल मतदार संघातून स्वर्गीय भाऊ अत्यल्प मतांनी विजयी झाले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या भाऊंसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आणि जीवनाची दिशा बदलणारा होता. प्रस्थापित राजकीय उमेदवाराला पराभूत करून भाऊ विजयी झाले होते. चेहऱ्यावर आनंद होता मात्र विजयाचा उन्माद नव्हता . ज्या जनतेने विश्वासाने मला निवडून दिले आहे त्या जनतेप्रति मी सतत बांधील असले पाहिजे. हीच कृती ठेवून ते कार्य करीत होते . मला आज ही आठवते त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आणि पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील होते . धरणगावला विलासराव देशमुख कुठल्यातरी कामानिमित्ताने आलेले असताना भाऊंनी जळगावच्या शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्री महोदय आणि पाटबंधारे मंत्री यांची भेट घेतली . या भेटीत भाऊंनी शेळगाव बॅरेजसह सातपुड्याच्या पर्वतरांगांवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी महाकाय जल पुनर्भरण योजनेची आवश्यकता रावेर, यावल ,चोपडा ,शिरपूर या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यांमध्ये सांगितली. या नव्या योजनेबद्दल स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी ऐकल्यानंतर भाऊंना भाऊ आपण कृषी शास्त्राचे पदवीधर आहात ? असा प्रश्न विचारला . त्यावर अत्यंत विनम्रपणे मी रसायनशास्त्राचा पदवीधर आहे . मग त्यावर लागलीच विलासराव उत्तरले ” तुमचा जलसिंचन आणि कृषी विभागाचा अभ्यास खूप मोठा आहे. सोबत शेतकऱ्यांप्रति तळमळ आहे. तेव्हा भाऊंनी अत्यंत विनम्रपणे सांगितले की ,” साहेब मी सामान्य कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा आहे. कृषी बी बियाणे यांचा लहानसा व्यवसाय करीत असल्यामुळे कोरडवाहू शेतकरी शेतमजुरांचे दुःख मी जवळून अनुभवीत आहे.पुढे आपल्या वीस वर्षाच्या लोकप्रतिनिधी म्हणून यशस्वी कारकीर्द मध्ये स्वर्गीय भाऊंनी शेतकरी, शेतमजूर, दलित- आदिवासी , कष्टकरी वर्गाला समोर ठेवून विधिमंडळ आणि संसदेमध्ये सातत्याने या वर्गाचे हिताचे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधले.आज महाकाय मेघा जल पुनर्भरण प्रकल्पाच्या उभारणीबाबत नुकतीच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन स्वर्गीय भाऊंनी या परिसराला संजीवन ठरणाऱ्या प्रकल्पाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दोघेही राज्य सरकारांची पाऊले पडत आहेत. हा प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यास या तालुक्यांमधील शेती , उद्योग व्यवसाय आणि नागरी वस्त्यांची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी समस्या मिटेल. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास विविध पिके शेतकऱ्यांच्या शेतीत त्याला घेता येतील. यातून शेतकरी आणि शेतमजुराचे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक विकास त्या कुटुंबाचा साधला जाईल. याच स्वप्नपूर्तीसाठी भाऊ जवळपास वीस वर्ष शासन दरबारी लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष करीत होते.
१९९५ ते १९९९ सत्तेवर असलेल्या भाजपा शिवसेना युतीच्या कालखंडात आमदार एकनाथराव खडसे पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास मंत्री असताना जळगाव जिल्ह्यात लहान आणि मध्य असे जलसिंचनाचे अनेक प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. त्यात “शेळगाव प्रकल्प ” ही होता. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी भाऊंनी २०१४ ते २०१९ च्या काळात तत्कालीन जलसंपदा विकास मंत्री मा. नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा करून शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधी मंजूर करून तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी भाऊंनी शासन दरबारी केलेले लक्षणीय प्रयत्न आमच्या सदैव स्मरणात राहतील….. आज हा प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित झाला आहे. परंतु हे हिरवं स्वप्न पाहण्यासाठी आज भाऊ मात्र आपल्यात नाहीत…..
यावल तालुक्यातील अंजाळे आणि पिळोदे गावाजवळील महाकाय पुलांची झालेली उभारणी , रावेर येथील सामाजिक न्याय विभागाच्या प्रशस्त वस्तीगृहाची झालेली उभारणी …. तसेच मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या आमोदा ते पाल – भिकणगाव या रस्त्याची झालेली निर्मिती , मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुसज्ज इमारती , तेथील प्रशिक्षित कर्मचारी,शेती आणि गावांसाठी नव्या विद्युत उपकेंद्रांची झालेली उभारणी या सगळ्याच बाबींमधून स्वर्गीय भाऊंची पायाभूत विकासाची दृष्टी आणि दृष्टिकोन लक्षात येतो.कृषीप्रधान देशातील शेतकरी सुखी झाल्याशिवाय समाज आनंदाने आणि समाधानाने जीवन जगू शकत नाही या विचारांनी भाऊंनी कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच मागील सरकारच्या कालखंडात त्यांची कृषी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्याअध्यक्षपदी तत्कालीन राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली होती . परंतु दुर्दैवाने या ठिकाणी काम करण्यास त्यांना अल्पकाळ मिळाल्याने या क्षेत्रात विशेष कामगिरी त्यांना करता आली नाही.
शेती- माती आणि माणसांवर नितांत प्रेम करणाऱ्या स्वर्गीय हरिभाऊंनी आपल्या खासदारकीचा आणि आमदारकीचा बडेजाव कधीच मिरवला नाही . आपल्या साध्या सरळ राहणी आणि स्वभावातून त्यांनी मतदारसंघ, जिल्हा ,राज्य आणि देश पातळीवर विविध पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांशी मैत्रीचे नाते निर्माण करून कार्यकर्त्यांची मने जिंकली होती . प्रशासनातील अधिकारी वर्गाशी भाऊ तितक्याच प्रेमळ व आपुलकीच्या भावनेने सतत वागत असत. जनतेच्या समस्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने तातडीने सोडवल्या पाहिजेत हा आग्रह मात्र त्यांनी कधीच सोडला नाही. आपले सामाजिक आणि राजकीय जीवन अत्यंत समर्पित भावनेने त्यांनी जगले . स्वतःपेक्षा दुसऱ्याचा आणि जनतेचा ते अधिक विचार करीत असत. सार्वजनिक जीवनातील व्यक्ती लाखो करोडो रुपये आपल्या वारसांसाठी कमवून जातात भाऊ मात्र याला अपवाद आहे. त्यांनी सत्ता, पद यापेक्षा चारित्र्य आणि समाज सेवेला अधिक महत्त्व दिले . त्यामुळेच आज एक आदर्श लोक प्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा समाज मनाच्या हृदयात सिंहस्थ झाली आहे.
२० जून २०२० ला जनसामान्यांचे व असामान्य नेतृत्व असलेले हरिभाऊ आपणा सर्वांना कायमचे सोडून गेलेत…
आज त्यांचा स्मृतिदिन……आयुष्याची जवळपास वीस वर्ष त्यांच्या सहवासाच्या छायेत राहण्याचे भाग्य मला मिळाले . इतक्या स्वच्छ आणि नितळ मनाचा लोकप्रतिनिधी दुर्लभच म्हणावा लागेल….!आज भाऊ असते तर नक्कीच त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या शेती- मातीतला आक्रोश तितक्याच संवेदनेने समजून उमजून घेणारा या राज्याला एक हरिभाऊ जावळे नावाचे कृषिमंत्री लाभले असते….!परंतु दुर्दैवाने स्वर्गीय हरीभाऊ शरीर रूपाने आज आपल्यात नाहीत ….त्यांच्या सहवासाच्या असंख्य आठवणीनी या क्षणी गर्दी केली आहे. त्यांचे सामाजिक समतेचे गुण्या गोविंदाने नांदणारे व कृषी विकासाने आर्थिक आणि भौतिक अंगाने समृद्ध असे गाव मतदार संघात निर्माण करण्याचे विचार आज त्यांचे सुपुत्र व रावेर विधानसभा क्षेत्राचे युवा व अभ्यासू आमदार अमोल जावळे कृतीतून जपत आहेत.
स्वर्गीय हरिभाऊंचे निस्सिम सामाजिक सेवेचे विचार आणि कृती आम्हा सर्वांना सामाजिक सेवेची ऊर्जा व नवी दिशा कायमच देत राहील….त्यांच्या विचार व कार्याला त्रिवार नमन आणि विनम्र अभिवादन….!
स्वर्गीय भाऊ तुम्ही नेहमीच विचार, आचार व संस्कारांनी कायमच आमच्या अंतःकरणात राहाल आयुष्याच्या शेवट पर्यंत …..
– प्रा.जतिन मेढे ,भुसावळ