शिंदी येथे विजेचा शॉक लागून म्हैस दगावली; शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील शिंदी येथील गट नंबर ४३ या शेतात घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा शॉक लागून एक म्हैस जागीच दगावली. सरवर उस्मानशहा छप्परबंद यांच्या मालकीची ही म्हैस अचानकपणे विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने मृत्युमुखी पडली.
या घटनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला असून, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, म्हशीचा शवविच्छेदन अहवाल पशुवैद्यकीय विभागामार्फत करण्यात आला आहे.
या घटनेनंतर महावितरणचे उप अभियंता जयंत धांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सदर प्रकाराची सविस्तर माहिती महावितरणच्या संबंधित विभागाकडे पाठवली असून, “सोमवारनंतर याबाबतचा अहवाल प्राप्त होईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी सरवर छप्परबंद यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून, इतर शेतकऱ्यांमध्येही विजेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटना रोखण्यासाठी महावितरण विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांतून होत आहे.