पैसे घेवून लग्न लावून फसवणूक प्रकरणी दोन महिलांना अटक !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे सोन्याचे दागिने घेवून तरुणी सोबल लग्न लावून देत कोल्हापूर येथील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन उर्फ पल्लवी राजपूत (वय ३३, रा. विवेक कॉलनी, गाडगेबाबा चौक) व रमा सुशिल कनौजिया (वय ३६, रा. चुंचाळे शिवार नाशिक) या दोघ संशयित महिलांना रविवारी अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील हरिविठ्ठलनगरातील मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिले व नंतर लग्नासाठी दिलेले पैसे तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. यात आत्महत्येप्रकरणी मुलीचा पती आशिष सदाशिव गंगाधरे, आप्पासाहेब बजरंग गंगाधरे, मिनाक्षी उर्फ मनिषा दिनेश जैन व सचिन दादाराव अडकमोल यांच्यासह सुजाता ठाकूर हीच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या सुजाता ठाकूर या महिलेचा शोध घेतला जात आहे.बेपत्ता असलेल्या पीडित मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तीने कोल्हापूर येथे विवाहानंतर तिच्या पतीने शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, त्यानुसार तिच्या पतीसह सात जणांविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या पीडितेचा पती आशिष गंगाधरे व मीना सुरेश जैन या दोघांना रविवारी अटक करण्यात आली आहे. उर्वरीत संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.