शेतकऱ्यांना खतांचा तातडीने पुरवठा करा; अन्यथा आंदोलन करू – शिशिर जावळे यांचा इशारा

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असताना, भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध होत नसल्यामुळे तीव्र अडचणीचा सामना करावा लागत आहे. खतांच्या टंचाईमुळे शेतकरी चिंतेत असून, कृषी विभागाच्या निष्क्रियतेवर भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जावळे यांनी आरोप केला आहे की, कृषी केंद्रांवर खत मिळवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. मात्र, केंद्रचालकांकडून खतांचा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोमंडल कंपनीने खतांचा सप्लाय थांबवला असून, केंद्र चालकांना कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा कृषी विभाग झोपलेला आहे का? असा थेट सवाल जावळे यांनी उपस्थित केला आहे.शेतकऱ्यांना वेळेवर खते न मिळाल्यास पिकांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यातील कृषी अधिकारी खत व औषध तपासणीसाठी जबाबदार असताना, ते आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी कार्यालयाशी विचारणा केली असता, खतांचा बंपर साठा १६ जुलै २०२५ नंतर वितरित केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जावळे यांच्या मते, तो साठा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अपुरा आहे आणि तो त्वरित उपलब्ध करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने खतांचा पुरवठा करावा, अन्यथा भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिशिर जावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

