जिल्ह्यात पर्यटन आणि कृषीउद्योग वाढीसाठी विशेष समन्वय बैठक

जळगाव. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जिल्ह्यातील पर्यटन, इकोटुरिझम आणि कृषी आधारित उद्योगांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समन्वय बैठक घेण्यात आली. जिल्ह्याच्या निसर्गवैभवाचा शाश्वत उपयोग करत रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योजकता आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने ही बैठक झाली. यामध्ये पर्यटन व वन विभाग, कृषी अधिकारी, सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग होता.
हतनूर धरण, गिरणा नदीकाठ, सातपुडा पर्वतरांगा, जैवविविधता समृद्ध गिरीशिखरे यांसारख्या निसर्ग पर्यटन स्थळांवर मूलभूत सुविधा उभारणे, पर्यटकांसाठी स्वच्छता, बायोटॉयलेट्स, पिण्याचे पाणी, माहिती फलक, नैसर्गिक ट्रेल्स, बोटिंग आणि सायकल ट्रॅक यांसारखे उपक्रम हाती घेण्यावर भर देण्यात आला. तसेच, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि होमस्टे योजना यांचा वापर करून स्थानिकांना पर्यटनातून थेट रोजगार उपलब्ध करून देण्याचा आराखडा मांडण्यात आला. पर्यावरणस्नेही धोरण राबवत, इकोटुरिझम क्षेत्रात तरुणांसाठी मार्गदर्शक प्रशिक्षण देण्याची दिशा ठरवण्यात आली.
कृषी उद्योगाच्या दृष्टीने शेतमाल प्रक्रिया केंद्रे, शीतसाखळी यंत्रणा, साठवणूक सुविधा आणि निर्यातक्षम मालाच्या उत्पादनाला चालना देण्याबाबत सखोल चर्चा झाली. स्थानिक उत्पादकांना थेट बाजारपेठांशी जोडण्यासाठी मार्केट लिंकेज प्रणाली विकसित करणे, तसेच कृषी क्षेत्रात नवउद्योजक घडवण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये सशक्त समन्वय ठेवत प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.
या विशेष बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि उपाययोजना हे भविष्यातील धोरण ठरविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे टप्पे मानले जात असून, जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून लवकरच काही प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून जळगाव जिल्हा ‘हरित पर्यटन’ आणि ‘कृषीउद्योग’ क्षेत्रात एक आदर्श मॉडेल म्हणून उदयास येईल, असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला.

