हत्येच्या कारणावरून तणाव: देवीच्या मूर्ती ठेवण्याच्या कारणावरून मारहाणीचा थरार, एकाचा मृत्यू
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ता. १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा या गावात देवीच्या मूर्ती ठेवण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातून राणा मनमौजदार पवार (वय ४५) यांचा खून करण्यात आला असून, त्यांच्या पत्नी मिनाक्षी राणा पवार यांनी याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, वरील वेळी व ठिकाणी देवीच्या मूर्ती ठेवण्यावरून झालेल्या वादात आरोपींनी एकत्र येऊन हातात कु-हाड, लोखंडी रॉड, आसारी व लाठ्याकाठ्या घेऊन फिर्यादी व इतर साक्षीदारांवर हल्ला चढवला. यामध्ये आरोपी क्रमांक १ गुरुदीप जिलीशबाबु पवार याने फिर्यादीच्या पतीच्या डोक्याच्या मागच्या बाजूस कु-हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेत आरोपी १) गुरुदीप जिलीशबाबु पवार, २) राजेंद्र बाबु सिगरेटबाबु पवार, ३) क्रिश राजेंद्रबाबु पवार, ४) दिपक जिलीशबाबु पवार, ५) जिलीशबाबु कोनानी पवार, ६) शक्तीकपुर सिगरेटबाबु पवार, ७) शिवकपुर शक्तीकपुर पवार, ८) लताबाई शक्तीकपुर पवार, ९) अनुलेखा दिपक पवार व इतर २-३ अज्ञात इसमांचा समावेश आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवणे, मारहाण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न व हत्या अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. आशिष आडसुळ करीत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण लालगोटा गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे , असे पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे