मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगले विचारमंथन; शहरातील नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्याचा मान्यवरांचा निर्धार

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून स्थानिक नहाटा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नाटा महाविद्यालय ग्रंथालयात विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शहरातील नाट्य चळवळीपुढील समस्या’ या विषयावर आयोजित या परिसंवादात भुसावळ परिसरातील नाट्य चळवळ कशी वृद्धिंगत करता येईल आणि रंगभूमीला गतवैभव कसे मिळवून देता येईल, यावर नाट्य क्षेत्रातील विविध अभ्यासक व मान्यवरांनी सखोल विचारमंथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री मोहनभाऊ फालक होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विकास कोळंबे आणि श्री चंद्रकांत चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुंदन तावडे यांनी सादर केलेल्या सुश्राव्य नांदीने झाली.
त्यानंतर पार पडलेल्या परिसंवादात वीरेंद्र पाटील, उमेश नेमाडे, आनंद सपकाळे, मनोहर शेठ जाधवाणी व अनिल कोष्टी या मान्यवरांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले. स्थानिक पातळीवर नव्या पिढीला नाटकाकडे कसे आकर्षित करावे, तंत्रज्ञान आणि प्रेक्षकवर्गाची आवड लक्षात घेऊन प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांना कसे प्रोत्साहन द्यावे, तसेच शहरातील नाट्य चळवळीसमोरील पायाभूत अडचणींवर कशी मात करावी, याबाबत वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याच कार्यक्रमात ‘युवारंग’ महोत्सवात विविध कलाप्रकारांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या नहाटा महाविद्यालयाच्या गुणवंत विजेत्या कलावंतांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन सुशील पाटील यांनी केले. परिसंवाद व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मराज देवकर, हरून उस्मानी, उमेश गोरधे, प्रबोध भावे आणि रिया कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शहरातील नाट्यप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

