Friday, November 6, 2026
Homeआरोग्यशासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे, आधाराचे केंद्र बनले पाहिजे - मंत्री गिरीश...

शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे, आधाराचे केंद्र बनले पाहिजे – मंत्री गिरीश महाजन

शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे, आधाराचे केंद्र बनले पाहिजे – मंत्री गिरीश महाजन

मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रसेवेच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून उत्कृष्ट, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच झाल्या पाहिजेत. हे रुग्णालय नेत्रोपचार व नवदृष्टीचे आदर्श केंद्र म्हणून नावारूपाला यावे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तर, प्रत्येक गरजू रुग्णाला दर्जेदार उपचारांसोबत माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे. शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांच्या विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र बनले पाहिजे, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह मॉड्युलर बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ६) पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार नंदकिशोर महाजन, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश चौधरी आदी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आधुनिक नेत्रतपासणी व शस्त्रक्रियांच्या सुविधा जळगावातच उपलब्ध झाल्यास विशेषतः वृद्ध आणि गरजू रुग्णांना उपचारांसाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. नेत्र विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात याकरिता महायुतीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले आहे. भविष्यात प्रस्तावित मेडिकल हब देखील तयार होते आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावांच्या माध्यमातून आपण या हबला पाणीपुरवठा देखील करून घेतला आहे. तसेच मेडिकल कॉलेजला इतर सुविधा मिळण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात असून भविष्यात देशातील टॉप मधील महाविद्यालय व रुग्णालय नागरिकांना उपलब्ध असेल असेही गिरीश महाजन म्हणाले. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचा विकास व प्रस्तावित मेडिकल हबची सद्यस्थिती विशद केली. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांनी मानले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. उमेश लाड, अधिसेविका अरुणा बोराडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डॅनियल साजी, संजय चौधरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या