Friday, November 6, 2026
Homeगुन्हाभुसावळ पोलिसांची एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई! किन्ही एमआयडीसीत पहाटे छापा; ६२.२१ ग्रॅम...

भुसावळ पोलिसांची एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई! किन्ही एमआयडीसीत पहाटे छापा; ६२.२१ ग्रॅम एमडीसह चौघांना अटक, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ पोलिसांची एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई!
किन्ही एमआयडीसीत पहाटे छापा; ६२.२१ ग्रॅम एमडीसह चौघांना अटक, ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ शहर आणि परिसरात अंमली पदार्थांची विक्री व सेवन वाढत असल्याच्या गंभीर प्रश्नाला अखेर पोलिसांच्या कारवाईने धक्का दिला आहे. भुसावळ तालुका पोलिसांनी किन्ही एमआयडीसी परिसरात धडक कारवाई करत तब्बल ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून चौघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे भुसावळ परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
दि. ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २.५५ वाजता किन्ही एमआयडीसी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ६२.२१ ग्रॅम एमडी पावडर, दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल हँडसेट असा एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या एमडीची किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असून, त्यापैकी ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान याच्याकडून हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी रिशभ कुणाल खेडकर (१८, रा. कंडारी), प्रथमेश दिलीप आव्हाड (२७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (२६, रा. नसरंजी फाईल) आणि असगरखान अनवरखान (५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) या चौघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी रॉयल एनफिल्ड बुलेट व पल्सर अशा दोन मोटारसायकली, तसेच आयफोन १६, आयफोन १३, टेक्नो आणि रेडमी कंपनीचे चार मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक २२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा प्रभारी अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भुसावळ तालुका पोलीस आणि

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
वृत्तपत्रातील बातमीनंतर पोलिसांची तत्परता; आता पुढील नेटवर्क उघड होणार का? या मोठ्या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, चार आरोपींना अटक आणि काही मुद्देमाल जप्त करूनच हा प्रश्न संपणार नाही. या अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतो? यामागे मोठे विक्रेते किंवा पुरवठादार आहेत का? शहरातील तरुणांपर्यंत एमडी पोहोचविणारे हात कोणते? या व्यवहारात आणखी किती जण सहभागी आहेत? याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुण पिढी अडकत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शैक्षणिक संस्था, तरुणांची वर्दळ असलेली ठिकाणे आणि शहराच्या विविध भागांमध्ये पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. केवळ एखादी कारवाई करून थांबण्याऐवजी या अवैध व्यवसायाच्या मुळापर्यंत पोहोचून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
देशदूतच्या वृत्ताने ऐरणीवर आलेला अंमली पदार्थांचा प्रश्न आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली धडक कारवाई ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचतात का, भुसावळला एमडी ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी सातत्यपूर्ण मोहीम राबविली जाते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या