महात्मा गांधी विद्यालयात एड्सविषयी जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम

वरणगाव, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी ता. भुसावळ दि ९ :
महात्मा गांधी विद्यालय,वरणगाव येथे दि ८ सोमवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वरणगाव यांच्या वतीने “एड्सविषयी जनजागृती व समुपदेशन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एड्स,सिकलसेल अॅनिमिया, थॅलेस्सीमिया यासारख्या गंभीर आजारांविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी समुपदेशक म्हणून सौ. ज्योती गुरव व सौ.भावना प्रजापती यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य सि.जे.तायडे सर होते.
किशोरवयीन विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शारीरिक,मानसिक व भावनिक बदलांबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.या वयात भिन्नलिंगी आकर्षण,चुकीच्या संगतीमुळे होणारे दुष्परिणाम तसेच व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.सौ.ज्योती गुरव यांनी एड्ससह अन्य आजारांविषयी सखोल माहिती दिली आणि त्यापासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांवर प्रकाश टाकला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ देखील घेतली.
कार्यक्रमात पर्यवेक्षक आर.एस.कोल्हे, पी. एस.झोपे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एस.नवगाळे सर यांनी तर आभार प्रदर्शन व्ही.आर.गावंडे सर यांनी केले.

