Thursday, September 17, 2026
Homeजळगावभुसावळातील हॉकर्स झोनचा तिढा कधी सुटणार?

भुसावळातील हॉकर्स झोनचा तिढा कधी सुटणार?

वर्षभरापासून स्थलांतर रखडले; ४० हजार चौरस फुटांची जागा तयार, तरी बाजारपेठेवरील अतिक्रमणाचा विळखा कायम

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा कळीचा मुद्दा ठरलेला हॉकर्स झोन स्थलांतराचा प्रश्न तब्बल वर्षभरापासून ‘तारीख पे तारीख’च्या फेऱ्यात अडकला आहे. फेरीवाल्यांसाठी गणपती मंदिराजवळ सुमारे ४० हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली. काँक्रीटचे ओटे उभारण्यात आले, आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या; मात्र एवढी तयारी करूनही प्रत्यक्ष स्थलांतराचा मुहूर्त काही प्रशासनाला सापडलेला नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या सुविधांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वर्षभरापूर्वी हॉकर्स झोन स्थलांतराबाबत प्रशासनाकडून घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळीनंतर स्थलांतर केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र दिवाळी झाली, निवडणुका झाल्या, सत्ताबदल झाला; तरीही हॉकर्स झोन मात्र जागेवरच आणि बाजारपेठेतील अतिक्रमणही पूर्वीप्रमाणेच! आश्वासनांची मालिका सुरू असताना प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचे चित्र आहे.

४० हजार चौरस फुटांची जागा तयार; मग अडचण नेमकी कुठे?

पालिकेने गणपती मंदिर परिसरातील सुमारे ४० हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देत काही अतिक्रमणे हटविली. फेरीवाल्यांसाठी काँक्रीटचे ओटे आणि आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या. मात्र, स्थलांतर होत नसल्याने या सुविधांचा वापरच होत नाही. उलट वापराविना पडून असलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जर जागा तयार आहे, ओटे तयार आहेत आणि सुविधा उपलब्ध आहेत, तर फेरीवाल्यांचे स्थलांतर नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
अप्सरा चौक ते सराफ बाजार; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
हॉकर्स झोनचा प्रश्न रखडल्याचा थेट परिणाम शहराच्या मुख्य बाजारपेठेवर होत आहे. अप्सरा चौक, सराफ बाजार, आठवडे बाजार परिसरासह प्रमुख रस्त्यांच्या कडेला फेरीवाल्यांची दुकाने थाटली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा दिवसेंदिवस कमी होत आहे.दुकानांसमोर हॉकर्स उभे राहिल्यानंतर ग्राहकांना दुकानात जाण्यासाठीही जागा उरत नाही. त्यात ग्राहकाने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली तरी वाहतुकीचा खोळंबा होतो. गर्दीच्या वेळेत वाहनांच्या रांगा लागतात. पादचाऱ्यांनाही वाहनांच्या गर्दीतून वाट काढावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या परिस्थितीत फेरीवाले, दुकानदार, ग्राहक आणि वाहनचालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा राहिलेला नसून शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.

आश्वासनांचा पाऊस; अंमलबजावणी मात्र शून्य!

हॉकर्स झोन स्थलांतराबाबत प्रशासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक आचारसंहिता, सत्ताबदल आणि प्रशासकीय प्रक्रिया यांसारखी कारणे पुढे करून प्रश्न लांबणीवर टाकला जात असल्याचे सांगितले जाते; परंतु नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

फेरीवाला संघटना आक्रमक;जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याचा निर्णय

फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष राजू सपकाळे यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित असून, पालिका निवडणुका होऊन आठ महिने उलटूनही प्रश्न सुटत नसेल तर प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फेरीवाला संघटनेने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याचा निर्णय घेतला असून, प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

पालिकेला आता मुहूर्ताची नव्हे, निर्णयाची गरज!

एकीकडे बाजारपेठेतील अतिक्रमण वाढत आहे, वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे; तर दुसरीकडे फेरीवाल्यांसाठी तयार करण्यात आलेली जागा आणि सुविधा वापराविना पडून आहेत.
मग हॉकर्स झोन स्थलांतरासाठी आणखी किती वर्षे ‘तारीख पे तारीख’ सुरू राहणार? ४० हजार चौरस फूट जागा तयार असूनही प्रशासनाला स्थलांतराचा मुहूर्त का सापडत नाही? लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधांचा वापर कधी होणार? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे आता पालिका प्रशासनाने नागरिकांसमोर देणे गरजेचे आहे. आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करून बाजारपेठेला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या