हैदराबाद गॅझेटियर नुसार बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गाचे आरक्षण द्यावे – गोरसेना

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्रप्रदेशातील बंजारा, लंबाडा जातीना अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे. मात्र १९४८ नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा सह विदर्भ खानदेशचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मुळ रहिवासी असलेले अनुसुचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येवून विमुक्त जातीच्या संवर्गात रुपांतरित करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने जि आर काढून जाहीर केले आहे. त्याला अनुसरुनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करुन अनुसूचीत जमातीचे एस टी चे आरक्षण देण्याची मागणी गोरसेनेने निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज दि. १० सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये असे नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाजवळ १९५० अगोदर अनुसुचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असून क्रिमीनल ट्राईब कायद्याने बाधीत असूनही सेंट्रल प्रोवीन्स व बेरार प्रांतामध्ये तसेच हैदराबाद गॅझेट मध्ये त्यांना अनुसुचित जमातीच्या यादीत स्थान दिलेले होते. मात्र भाषावार प्रांतरचना, राज्य पुनर्चना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील गोरबंजारा लमाण लंबाडी यांना बसला असून मुळ आरक्षणाला मुकावे लागले आहे. यासाठी गोरबंजारा समाजाने सातत्याने संघर्ष पुकारला असून त्यांना न्याय देण्यासाठी बापट आयोग, इधाते आयोग, भाटीया आयोग डि एन टी / एस टी आयोगाने महाराष्ट्रातील गोरबंजारा हा अनुसुचित जमातीचे आरक्षणाबाबत सकारात्मक शिफारशी करुनही त्यांना ते आरक्षण देण्यात आलेले नाही. डोंगर दऱ्यात राहणारा समाज आजही आदीम समुदायाची सर्व पात्रता पूर्ण करतो कारण स्वतंत्र बोली, भाषा, पेहराव, धाटीपरपंरा, स्वतंत्र तांडावस्ती, खानपान, स्वतंत्र असूनही त्यांना एस टी आरक्षणा पासून जाणीवपूर्वक टाळले जात आहे. अनुसूचित जमातीचे आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत रामराव महाराज सह अन्य समाजसुधारकांनी सातत्याने प्रयत्न केले असून – गोरसेना या बंजारा समाजातील अग्रगण्य संचटनेने गेल्या विस वर्षापासून मोर्चा आंदोलने केलेली आहेत. मराठा कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू होते. त्या धर्तीवर गोरबंजारा समाजासाठी सुद्धा तेच गॅझेट लागू करुन एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी मागणी गोरसेनेने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद यांच्या मार्फत केलेली आहे.
यावेळी गोर सेना तसेच सकल बंजारा समाजाकडून जळगाव येथील जी एस ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला असून यावेळी संपूर्ण बंजारा समाजातील सामाजिक संघटना व पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला तसेच गोर सेनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग लगत भव्य असा संत सेवालाल महाराज यांचा पुतळा उभारावा अशी ही मागणी करण्यात आली आहे.

