सेंट अलॉयसिस शाळेच्या धार्मिक सहलीवरून भुसावळमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा

गट शिक्षणाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांना दिले मागणीचे निवेदन
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील सेंट अलॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये सद्भावना दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या धर्मस्थळ भेटीच्या सहलीवरून मोठा वाद निर्माण झाला असून,या सहलीद्वारे हिंदू विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजातर्फे सकाळी अकरा वाजता भुसावळ शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता .
याप्रसंगी प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील व गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांना निवेदन देण्यात आले आहे .

यावेळी भाजपा, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, राधाकृष्ण प्रभात फेरी, माहेश्वरी भवन ट्रस्ट, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, श्रीवर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ भुसावळ, भुसावळ शहर व्यापारी मंडळ, आदींसह विविध हिंदू सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आली.
मोर्चा मध्ये महामंडलेश्वर पवन दासजी महाराज, कन्हैया दासजी महाराज, ॲड. भारती वैष्णव, प्रमोद सावकारे,माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र नाटकर,भाजपाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे किरण कोलते , शिशिर जावळे करणी सेनेचे संदीप पाटील, शिंदे सेनेचे दीपक धांडे, शिवसेना उबठा चे दिलीप सुरवाडे, राधेश्याम लाहोटी आदींसह मोठ्या संख्येने सकल हिंदू बांधवांची उपस्थिती होती.
सहलीत एकतर्फी धार्मिक माहितीचा आरोप
१० सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड पाठ्यपुस्तकाच्या आधारे शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली.मात्र,निवेदनानुसार या सहलीदरम्यान चर्च व मशिदीमध्ये विद्यार्थ्यांना ख्रिस्ती व इस्लाम धर्माची माहिती व प्रत्यक्षिके देण्यात

आली.विद्यार्थ्यांना चर्चमध्ये प्रार्थनेची पद्धत शिकवली गेली,तर मशिदीत नमाज पद्धती समजावून सांगण्यात आली आणि “इस्लाम आतंकवाद नव्हे,आदर्श” या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. याशिवाय,विद्यार्थ्यांना मशिदीत खजूर व चहा-बिस्कीट दिले गेले.निवेदनात म्हटले आहे की,विद्यार्थ्यांना मशिदीत जाण्यापूर्वी त्यांच्या युनिफॉर्ममधील रुमाल टोपी अथवा हिजाबप्रमाणे परिधान करण्यास सांगण्यात आले.हे सर्व प्रकार हिंदू विद्यार्थ्यांच्या इच्छेविरुद्ध झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हिंदू धर्माबाबत दुर्लक्षाचा आरोप
यावेळी गुरुद्वारा व शिवमंदिरालाही भेट देण्यात आली,परंतु निवेदनात म्हटले आहे की, या स्थळांवर कोणतीही धार्मिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही.
शिवमंदिरात दर्शन घेणे ‘ऐच्छिक’ असल्यामुळे काही विद्यार्थी मंदिरात गेलेच नाहीत, तर इतर विद्यार्थी फक्त प्रांगणात उभे राहिले.

शाळेवर पूर्वीही धार्मिक भेदभावाचे आरोप
सकल हिंदू समाजाच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीदेखील शाळेने हिंदू धार्मिक परंपरांवर बंधने लादली आहेत.जसे की,विद्यार्थ्यांना राखी बांधून,कलावा घालून,टिकली लावून किंवा मेहंदी लावून येण्यास मनाई करण्यात आली आहे.तसेच,राष्ट्रगीतानंतर शाळेत ख्रिस्ती प्रार्थना वाजवली जाते,असा आरोप करण्यात आला आहे.
शाळेवर कठोर कारवाईची मागणी
या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून,हिंदू धर्मीय विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावनांचा अवमान झाला आहे. शाळेचे शासकीय अनुदान बंद करावे,शाळेवर प्रशासक नेमावा,तसेच संबंधित शिक्षकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा, पुढील काळात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे.
यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी संदिप गावीत यांचे मार्गदर्शना खाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता .

