उबाठा शिवसेनेच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी अॅड. प्रकाश पाटील यांची नियुक्ती – जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव
जामनेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी अॅड. प्रकाश पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर तालुक्यात आणि जिल्हाभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली असून, गेल्या चार दशकांहून अधिक काळ निष्ठेने शिवसेनेत कार्य करणाऱ्या या ज्येष्ठ नेत्याला अखेर पक्षाची जबाबदारी बहाल करण्यात आली आहे.
अॅड. प्रकाश पाटील हे मूळचे अंबिलहोळ (ता. जामनेर) येथील असून, समाजसेवा, कायदा क्षेत्रातील योगदान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांना संपूर्ण तालुक्यात ओळख मिळालेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उबाठा शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांनी अंबिलहोळ येथे ग्रामपंचायतीत सदस्य आणि सरपंच म्हणून कार्य केले असून, 1980च्या दशकात गावाच्या विकासासाठी स्वतःची शेतीही दिली होती. त्यांनी तरुणपणीच शिवसेनेची चळवळ तालुक्यात रुजवली होती. आजही वकील म्हणून कार्यरत असलेल्या अॅड. पाटील यांनी अनेक सामाजिक प्रश्न सामोपचाराने सोडवले आहेत.
शिवसेना-भाजपा युतीच्या काळातही त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता पक्षनिष्ठा जपली. त्यांची विधानसभा व लोकसभा उमेदवारी चर्चेत असताना देखील त्यांनी पक्षाच्या निर्णयाला मान दिला. त्यांच्या या कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.
त्यांच्या निवडीनंतर तालुक्यातील सर्वधर्मीय समाज, वकील संघ, ग्रामस्थ आणि शिवसेनेतील जुन्या जाणत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“उबाठा शिवसेना तालुक्यात नव्या दमाने कार्य करेल, आणि अॅड. प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा बळकट होईल,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.