राष्ट्रीय दुःखवट्यामुळे श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील स्नेह-संमेलनाचे कार्यक्रम रद्द
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी राज्याचे उप-मुख्यमंत्री कै. मा. अजितदादा पवार यांचे अपघाती व अत्यंत दुःखद निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे.
या राष्ट्रीय दुःखवट्याच्या अनुषंगाने श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे स्नेह-संमेलनानिमित्त दिनांक २९ जानेवारी २०२६ व ३० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कै. मा. अजितदादा पवार यांनी राज्याच्या सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्यात मोलाचे योगदान दिले असून, त्यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्याच्या भावनेतून शासनाच्या निर्देशानुसार सर्व शैक्षणिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे स्नेह-संमेलनाच्या नियोजनात बदल करण्यात आला असून, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

