भुसावळात सट्ट्यावर मोठी कारवाई; दोघांना अटक, २२४० रुपये व साहित्य जप्त
भुसावळ | खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क
शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमजवळ सार्वजनिक ठिकाणी सट्टा जुगार स्वीकारत असलेल्या दोघा इसमांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून २,२४० रुपये रोख रक्कम व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
शहरातील अवैध धंदे २६ जानेवारीपर्यंत बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.
याच मोहिमेअंतर्गत जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमजवळ सार्वजनिक ठिकाणी सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करत संशयित रवींद्र रामचंद्र दांईजे (रा. जाम मोहल्ला) व योगेश शंकर जाधव (रा. बद्री प्लॉट, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे सट्टा बंद असतानाही लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी सोपान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात ता. २९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी तेजस पारीसकर करीत आहेत.
या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

