मोठी कारवाई : ड्रग्ज माफियाला पोलिसांनी केली अटक ; मॅफेड्रॉन एमडी ड्रग्ज जप्त !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील मेहरुण बगिचा परिसरातील जे. के पार्कच्या जून्या स्विमींग टैंक परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाई मेहमूद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी) याच्याजवळून ८२ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मेहरुण परिसरातील जे, के पार्क जवळील स्विमींग पुलजवळ काही संशयित एमडी ड्रग्ज विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि गायकवाड यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने दुपारच्या सुमारास छापा टाकला असता, संशयास्परित्या फिरणाऱ्या मेहमूद हनीफ पटेल याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एका विमलच्या पुडीमध्ये प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या दोन एमडी ड्रग्जच्या पुड्या मिळून आल्या. ताब्यात घेतलेल्या संशयित ड्रग्ज माफिया मेहमूद पटेल याची चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ मिळून आलेले ड्रग्ज प्रत्येकी दहा हजार रुपये ग्रॅम प्रमाणे तो विक्री करणार होता. पोलिसांनी संशयिताकडून सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी संशयित मेहमूद हनीफ पटेल (रा. ३५, रा. ममता हॉस्पिटल मास्टर कॉलनी) व अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे.मेहमूद पटेल याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली असता, त्याने हे एमडी ड्रग्ज अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. अरमान पटेल याला मेहमूदला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच तो पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ, उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, सलीम तडवी, किशोर पाटील, गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, रवीद्रं चौधरी, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

