दसरा-दिवाळीत उपासमार! वेतन अधीक्षकांकडून वेतन थांबवून छळ, शिक्षकांनी मांडला जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील वेतन अधीक्षक रियाज तडवी यांच्या मनमानी कारभाराने जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले आहेत. कोणतेही लेखी आदेश किंवा ठोस कारण नसताना तडवी यांनी वैयक्तिक हट्टाने पगार थांबविल्याचा गंभीर आरोप पीडित शिक्षकांनी केला आहे. शनिवारी 4 ऑक्टोबर रोजी शिक्षकांनी सकाळी 11 वाजता शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
या शिक्षकांनी दिलेल्या निवेदनानुसार, अनेक वर्षांपासून ते नियमितपणे काम करत असूनही त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. वेतनाबाबत विचारणा केल्यास रियाज तडवी हुकूमशहासारखे वर्तन करत ‘तुमचे वेतन निघणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा’ अशी उर्मट उत्तरे देतात. विशेष म्हणजे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनीही ‘मी वेतन थांबवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत’ असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तडवी हे केवळ स्वत:च्या मनमानीने शिक्षकांचा मानसिक छळ व पिळवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात वेतन न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

