Friday, November 20, 2026
Homeजळगावइंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट..."; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचाच सरकारवर हल्लाबोल, फडणवीसांसमोरच व्यक्त केली...

इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट…”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचाच सरकारवर हल्लाबोल, फडणवीसांसमोरच व्यक्त केली नाराजी.

इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट…”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचाच सरकारवर हल्लाबोल, फडणवीसांसमोरच व्यक्त केली नाराजी.

नागपूर / यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि.२०  – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट आपल्याच सरकारवर तोफ डागली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच “इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट…” अशा कडक शब्दांत त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर येथे ७ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे.अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक नागपूरात बोलावण्यात आली होती.या बैठकीतच मुनगंटीवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली.

ठळक मुद्दे —
फडणवीसांसमोरच कडक शब्दांत नाराजी :
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतानाच मुनगंटीवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट” हे वक्तव्य म्हणजे सत्ताधारी पक्षातील अंतर्गत असंतोषाचा स्फोट मानला जात आहे.

विदर्भावर अन्यायाचा आरोप :
विदर्भाला निधी वाटपात सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी यापूर्वीही अधिवेशनात केला होता. अधिवेशन नागपुरात होऊनही विदर्भाच्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंब दिसत नसल्याची टीका त्यांनी केली.

वैधानिक विकास मंडळाचा मुद्दा — विदर्भ-मराठवाड्यासाठीचे वैधानिक विकास मंडळाची मुदत ३० एप्रिल २०२० रोजी संपली. त्यानंतर पाच वर्षे उलटूनही मंडळाची पुनर्रचना झालेली नाही. हे संविधानाच्या कलम ३७१ ( २ ) चे उल्लंघन असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

१०० हून अधिक पत्रे,तरीही दुर्लक्ष —
वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी १०० हून अधिक पत्रे आली आहेत, मात्र सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

२०० कोटींचा खर्च,पण हाती काय.? —-
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपये खर्च होतात. केवळ जेवणासाठी लोक येतात, पण प्रत्यक्षात काहीच साध्य होत नाही असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या —
अर्थसंकल्पात विदर्भ,मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राला दिलेल्या निधीचे आकडे दाखवले जातात पण नंतर ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होतात. यातून निधी वाटपात मोठा असमतोल असून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मंत्रिपदावरून डावलल्याची पार्श्वभूमी :
मागील मंत्रिमंडळ विस्तारात मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नव्हते.वआपले नाव सुरुवातीला यादीत होते, पण ऐनवेळी काढल्याचा दावा त्यांनी केला होता. तेव्हापासून त्यांची नाराजी उघडपणे दिसून येत आहे.
“दुसरे एकनाथ खडसे होताय का?” — मुनगंटीवार यांच्या टीकेनंतर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी “तुम्ही दुसरे एकनाथ खडसे होण्याचा प्रयत्न करताय का?” असा सवाल केला. २०२० मध्ये खडसे यांनी फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने भाजप सोडली होती, त्याची आठवण या निमित्ताने करून देण्यात आली.

विरोधकांकडून “विरोधी पक्षनेते” अशी खिल्ली :
हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवार यांनी इतक्या वेळा सरकारला घेरले की, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांना थट्टेने “विरोधी पक्षनेते” म्हटले होते.

चंद्रपूरमधील पराभवाची किनार :
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला १० पैकी ८ नगरपालिका / नगरपंचायतींमध्ये पराभव पत्करावा लागला. स्थानिक संघटनांना नेतृत्वाने पुरेसा पाठिंबा दिला नसल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली होती.
काय म्हणाले मुनगंटीवार?
“विदर्भातील जनतेशी विश्वासघात होता कामा नये. विदर्भ-मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय होत आहे. दांडेकर समिती आणि विजय केळकर समितीचे अहवाल येऊनही बॅकलॉग दूर करण्यासाठी सरकार काय करत आहे?”

भाजपमध्ये अस्वस्थता
मुनगंटीवार हे १९९५ पासून सात वेळा आमदार आहेत.अर्थ, नियोजन,वन,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत.अर्थमंत्री असताना त्यांनी सादर केलेल्या शिल्लक अर्थसंकल्पाची देशभरात दखल घेतली गेली होती. ५० कोटी वृक्षलागवडीच्या मोहिमेचे श्रेयही त्यांना जाते.

अशा ज्येष्ठ नेत्याने वारंवार सरकारवर टीका केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ही टीका पक्षनिष्ठेतून आहे की मंत्रिपद न मिळाल्याच्या नाराजीतून,यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

मुनगंटीवार यांचे हे वक्तव्य सरकारला जागे करणारे ठरेल का, की भाजपमधील अंतर्गत कलह आणखी वाढवणारे ठरेल, हे येत्या हिवाळी अधिवेशनात स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या