Friday, November 20, 2026
Homeगुन्हालग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! तरुणाची हत्या; पाच संशयित अटकेत

लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! तरुणाची हत्या; पाच संशयित अटकेत

लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! तरुणाची हत्या; पाच संशयित अटकेत

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील बोरणार येथे लग्नसोहळ्यात झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाले. प्रेम गोपाल धनगर (वय २३) या तरुणाची पाच जणांनी मारहाण करून पाठीत चॉपर खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोरणार येथील रहिवासी प्रेम धनगर हा आई-वडिलांसोबत राहत होता. १८ तारखेला सायंकाळी तो आपल्या आतेभाऊ सुनील धनगर यांच्या घराजवळील चौकात गेला होता. त्याठिकाणी अनिस पटेल यांच्या मुलीच्या लग्नसमारंभाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी प्रेमने कार्यक्रमात जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर सुनील धनगर यांनी त्याची समजूत काढून त्याला घरी नेले.मात्र, काही वेळानंतर प्रेम पुन्हा लग्नसमारंभाच्या ठिकाणी गेला. तेथे पुन्हा वाद निर्माण झाला. या वादातून पाच जणांनी त्याला मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याच्या पाठीत वार केले. या हल्ल्यात प्रेमचा मृत्यू झाला.घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेतली होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.एलसीबी आणि एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने संयुक्त तपास करत पाच संशयितांना अटक केली. त्यामध्ये अनिस अजीज पटेल (४५), आदील अजीज पटेल (३२), सादीक मुर्शीद पटेल (२८, तिघे रा. बोरणार), शोएब ईस्माईल पटेल (३२, रा. नाचनखेडा, ता. जामनेर) आणि अश्पाक मेहमूद पटेल (२७, रा. यावल) यांचा समावेश आहे.

पाचही संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, गावातील तणाव लक्षात घेता स्थानिक पोलीस आणि आरसीपी पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात प्रेमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या