जळगाव पोलीस दलात मोठी खांदेपालट! बोदवड, शनिपेठसह आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी बदलले !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जिल्ह्यातील पोलीस दलात अचानक मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून बोदवड, शनिपेठ पोलीस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेतील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले. अचानक झालेल्या या खांदेपालटमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याकडे एएचटीयूच्या प्रभारी अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बोदवड पोलीस ठाण्याचा पदभार दुय्यम अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांनाएएचटीयूच्या प्रभारी अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले असून त्यांना मानव संसाधन विभागात पूर्णवेळ कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनाही शनिपेठ पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर होऊन अनुपालन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनहित, प्रशासकीय कारणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.

