जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शनिवारी रात्री गणपती नगरात एका सामान्य कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर झालेला सशस्त्र हल्ला आणि गोळीबार, शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ८ ते १० जणांच्या टोळक्याने एका कुटुंबाला लक्ष्य करत केलेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, संपूर्ण परिसरातील शांततेवर आणि नागरिकांच्या सुरक्षेवर केलेला हल्ला आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आपल्या घरातही आपण सुरक्षित आहोत का? असा सवाल विचारला जात आहे.चंद्रशेखर पाटील हे एक सामान्य कुरिअर कर्मचारी आहेत. त्यांचे कोणाशी वैर असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. असे असतानाही, रात्रीच्या वेळी त्यांच्या घरावर इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला होतो, दगडफेक आणि गोळीबार केला जातो, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हल्लेखोर शिवीगाळ करत आले, त्यांनी दुचाकीची तोडफोड केली आणि थेट गोळीबार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का, अशी चर्चा सुरू झाली आहे.रात्रीच्या वेळी घडलेल्या या “सिनेस्टाईल” थरारनाट्यामुळे पाटील कुटुंब प्रचंड मानसिक धक्क्यात आहे.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली असली तरी, हल्लेखोर अद्याप मोकाट आहेत. या हल्ल्यामागे वैयक्तिक कारण आहे की परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू आहे, याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेच्या निमित्ताने शहरातील रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.