Thursday, October 16, 2025
Homeगुन्हाअमळनेर पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी ४ हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

अमळनेर पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी ४ हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

अमळनेर पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी ४ हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

अमळनेर         खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            । जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अमळनेर कार्यालयातील उपविभागीय अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे अमळनेर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे खासगी ठेकेदार असून, त्यांनी चोपडा तालुक्यातील मौजे व मजरे हिंगोणे येथे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३ लाख ५५ हजार रुपयांचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले होते. या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदार १३ ऑक्टोबर रोजी अमळनेर येथील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात गेले होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी ठेकेदाराकडे त्यांच्या बिलाच्या रकमेतील २ टक्के रक्कम लाच म्हणून मागितली. ही रक्कम सुमारे ७ हजार रुपये होत होती. लाचेची मागणी झाल्यामुळे ठेकेदाराने याबाबतची तक्रार जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

लाच लुचपत विभागाने तक्रारीची शहानिशा करून, बुधवारी (दि. १५ ऑक्टोबर) अमळनेर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. ठरलेल्या तडजोडीनुसार, उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील हे तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारत असतानाच, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे अधिकारी करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या