Thursday, October 16, 2025
Homeजळगावपरप्रांतीय तरूण गिरणा नदीत बुडून दुदैवी मृत्यू; परिवारावर शोककळा

परप्रांतीय तरूण गिरणा नदीत बुडून दुदैवी मृत्यू; परिवारावर शोककळा

परप्रांतीय तरूण गिरणा नदीत बुडून दुदैवी मृत्यू; परिवारावर शोककळा

जळगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     । जळगाव तालुक्यातील लमांजन येथील गिरणा नदीच्या किनाऱ्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे मजुरीसाठी आलेल्या मध्य प्रदेशातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या जयसींग सुभाष बारेला (वय ४०) यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांच्या कपड्यांमुळे आणि मोबाईलमुळे ते नदीत बुडाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबाला आला आणि त्यांनी तातडीने शोध सुरू केला.

मूळचे शिरवेल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असलेले जयसींग हे मजुरीसाठी लमांजन येथे वास्तव्याला होते. मंगळवारी सायंकाळ होऊनही जयसींग घरी परतले नाहीत, यामुळे त्यांची वृद्ध आई आणि घरी आलेली बहीण चिंतित झाली. त्यांनी लगेच नदीकाठी पाहणी केली असता, कपडे व मोबाईल किनाऱ्यावर मिळून आले. यामुळे काळजाचा ठोका चुकलेल्या आई व बहिणीने मदतीसाठी धाव घेतली.

त्यांनी तातडीने ही बाब लमांजन गावाचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांच्या कानावर घातली. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला. रात्रभर शोध घेऊनही यश न आल्याने, बुधवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आणि अखेर जयसींग यांचा मृतदेह नदीपात्रातून काढण्यात आला.

जयसींग यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे लमांजन गावात हळहळ व्यक्त होत आहे. मजुरीसाठी आलेल्या कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या