मोबाईल-सुविधा नसतानाही आशा वर्करवर ‘ऑनलाईन काम’ सक्तीचा दबाव!

गटप्रवर्तक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धमक्या; नागरिकांमध्ये संतापाची भावना
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील आशा वर्कर या अल्प मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य सैनिकिनी. कोरोना काळात स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता नागरिकांची काळजी घेणाऱ्या या आशा ताई आज स्वतः अन्यायाविरुद्ध लढत आहेत. कारण — वरिष्ठ अधिकारी व गटप्रवर्तकांकडून “ऑनलाईन काम करावेच लागेल, नाहीतर कामावरून कमी करू” अशा सरळ धमक्या दिल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
शासनाने ना मोबाईल दिला, ना रिचार्ज, तरीही सक्ती मात्र शंभर टक्के!
आशा वर्करना कोणताही अँड्रॉइड मोबाईल शासनाकडून देण्यात आलेला नाही. मोबाईल रिचार्जसाठीही कोणतीही आर्थिक मदत नाही. तरीसुद्धा त्यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जात आहे. “एका बाजूला सुविधा नाहीत, दुसऱ्या बाजूला धमक्या — मग काम कसे करायचे?” असा सवाल आशा वर्कर उपस्थित करत आहेत.लाखो रुपयांचा पगार घेणारे अधिकारी मात्र स्वतः फील्डमध्ये उतरत नाहीत, पण रोज घराघरांत जाऊन सेवा करणाऱ्या आशा ताईंवर फोन-इंटरनेटचा बोजा टाकत आहेत — याबद्दल नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे.
भरती वेळी अट नव्हती, मग आता सक्ती का?
आशा वर्करची नियुक्ती ८वी व १०वी पास उमेदवारांवर करण्यात आली होती. त्या काळात ऑनलाईन काम ही अपेक्षा नव्हती. आज मात्र अचानक डिजिटल कामे अनिवार्य करून, त्यातही धमक्या देऊन, आशा वर्करना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोना काळातील योगदान विसरले का?
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या आशा ताईंचे आज अवमानासारखे वागणूक मिळत आहे, असा सूर जनतेत ऐकू येत आहे.
“अधिकार कोणाने दिला?” — नागरिकांचा सवाल
गटप्रवर्तक व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारे धमक्या देण्याचा अधिकार कोणी दिला? असा थेट प्रश्न मुक्ताईनगर शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालणे गरजेचे आहे, अन्यथा आशा वर्करमध्ये असंतोष वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

