शिवसेना (उबाठा) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर ‘एबी फॉर्म’ साठी १० लाख रुपये मागितल्याचा शिवसैनिकाचा गंभीर आरोप !
भुसावळातील राजकारणात मोठी खळबळ – पक्षांतर्गत पैशांचा व्यवहार व उमेदवारी वाटपात भ्रष्टाचार, लेखी पुरावा आला समोर !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शर्मा यांच्यावर पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असलेला ‘एबी फॉर्म’ देण्यासाठी जेष्ठ शिवसैनिक असलेल्या उमेदवाराकडून थेट १० लाख रुपये मागितल्याचा गंभीर आरोप आणि पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार द्वारे करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे .
भुसावळ येथील जेष्ठ शिवसैनिक आणि निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवार शरद गुलाबचंद जैस्वाल व त्यांची पत्नी सौ. कविता शरद जैस्वाल यांनी शिवसेना (उबाठा) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला आहे. दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शरद जैस्वाल यांनी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शर्मा यांच्याशी भेटून आणि संपर्क साधला असता, शर्मा यांनी “उद्या (१७ तारखेला) एबी फॉर्म मिळतील” असे सांगितले.दि. १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा फोन केला असता शर्मा यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर पक्षाचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना मेसेज केला, परंतु त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या वैयक्तिक भेटीत चंद्रकांत शर्मा यांनी थेट सांगितले की, “जैस्वालजी, तुम्ही १० लाख रुपये देऊ शकत असाल तरच तुम्हाला एबी फॉर्म मिळेल. जे उमेदवार पैसे देतील, त्यांनाच फॉर्म मिळेल.” ऑनलाइन नामनिर्देशन पत्र दाखल करूनही शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने जैस्वाल दाम्पत्याला अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावा लागला आणि परिणामी त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले.जैस्वाल यांनी पत्रात म्हटलेलं आहे की, “जिल्हा प्रमुखांनी पैशाची मागणी केल्यामुळेच शेवटच्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म मिळाले नाहीत आणि अनेक जण अपक्ष उमेदवार म्हणून उतरले तर काही जण निवडणूकी पासून वंचित राहिल्याने त्यांचा विश्वासघात झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.”
या प्रकरणामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मधील अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत पैशांचा व्यवहार आणि उमेदवारी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा हा पहिलाच थेट लेखी पुरावा समोर आला आहे.विशेष म्हणजे सत्तेत नसलेल्या पक्षात असा प्रकार असेल तर इतर सत्ताधारी पक्षाचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .

