राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा लूटमार : भुसावळातील एकाची चुंचाळे फाट्यावर २४ लाखांची दिवसाढवळ्या लूट!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील चोपडा-यावल राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा लूटमारीची एक खळबळजनक घटना घडली आहे. चुंचाळे फाट्याजवळ दोन अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील साडे चोवीस लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, किरण प्रभाकर पाटील (वय ५०, रा. राम मंदिर वार्ड, भुसावळ) हे भुसावळ येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास ते चोपडा येथून २४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम एका बॅगेत घेऊन आपल्या दुचाकीने भुसावळकडे निघाले होते. ते चोपडा-यावल रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ आले असता, पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली. चोरट्यांनी पाटील यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि त्यांच्या हातातील रोख रकमेची बॅग हिसकावून वेगाने पळ काढला.अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पाटील हादरून गेले होते. त्यांनी तातडीने यावल पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला असून चोरटे ज्या दिशेला पळून गेले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर धागेदोरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. भररस्त्यात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

